
नायर दंत रुग्णालय व दंत वैद्यकीय महाविद्यालयाला बीडीएस पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी संख्येतील क्षमता वाढीला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत दंत वैद्यकीय शाखेकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या 67 वरून 75 झाली आहे. भारतीय दंत वैद्यकीय परिषद (डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया) यांच्याकडूनही या मान्यतेसाठी शिफारस करण्यात आली होती.
मुंबई महापालिका संचालित नायर दंत रुग्णालय आणि दंत वैद्यकीय महाविद्यालयात दैनंदिन वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता अधिकाधिक दर्जेदार सेवा देणे आगामी काळात शक्य होणार आहे. त्यामुळे बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी (बीडीएस) या पदवी अभ्यासक्रमासाठी अधिक विद्यार्थी प्रवेश करणे महाविद्यालयाला शक्य होणार आहे. बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी या पदवी अभ्यासक्रमांतर्गत एकूण 75 विद्यार्थ्यांची तुकडी यंदा उत्तीर्ण झाली आहे आणि सरकारकडून मान्यता प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. दरम्यान, आगामी काळात विद्यार्थी संख्या 100 पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असून त्यादृष्टीने पायाभूत सुविधांमध्ये तसेच मनुष्यबळामध्ये वाढ केली जाणर आहे, असे नायर रुग्णालय आणि दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी सांगितले.
अशा वाढल्या जागा
विद्यार्थ्यांच्या वाढीव जागांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल (ईडब्ल्यूएस) श्रेणीअंतर्गत 2017 मध्ये 60-67 आणि नंतर 67-75 विद्यार्थी संख्येतील वाढ प्रस्तावित करण्यात आली होती. या वाढीसाठी मान्यता प्राप्त झाली आहे. या विद्यार्थी क्षमतावाढ मान्यतेसाठी एकूण चार वर्षांचा कालावधी लागला आहे. या कालावधीत भारतीय दंत वैद्यकीय परिषद व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्याकडून आकस्मिक भेटी व पाहणी दौरे घेण्यात आले.