ठसा – रत्नाकर मतकरी

751

>> प्रशांत गौतम

जगभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यात होणारे मृत्यू हे चिंताजनक आहे. त्याचा तडाखा आज साहित्य आणि नाट्यक्षेत्रातील रत्नाकर मतकरी या प्रख्यात लेखकासही बसला. दोन्ही क्षेत्रांत आपल्या लेखनाची अमीट छाप सोडणारे  हे ‘रत्न’ साहित्य आणि नाट्यसृष्टीने आज गमावले आहे. मतकरी यांचे अशा प्रकारे झालेले निधन नक्कीच क्लेशदायक आहे. त्यांच्या अकाली एक्झिटमुळे साहित्य, नाट्यक्षेत्र सुन्न झाले आहे. साहित्य आणि नाट्यरसिक व्यथित आहे. 1938 साली मुंबईत जन्म झालेल्या रत्नाकर मतकरी यांची वयाच्या सतराव्या वर्षी आकाशवाणीवर ‘वेडी माणसं’ ही एकांकिका प्रसारित झाली आणि तेंव्हापासून सुरू झालेला हा बहुआयामी प्रवास पुण्यात 81 व्या वर्षी थांबला. खरे तर संपूर्ण मतकरी कुटुंबच नाट्यवेडे होते. त्यांचे सासरे म्हणजे ज्येष्ठ नाट्य समीक्षक माधव मनोहर. पत्नी प्रतिभा, मुलगी सुप्रिया, मुलगा जगेश अशा नाट्यमय वातावरणात रत्नाकर मतकरी यांचा लेखन प्रवास सुरू असे. ‘वेडी माणसं’ ही एकांकिका मुंबई आकाशवाणी केंद्रावर 1955 साली प्रसारित झाली. तेव्हाच जाणकारांचे लक्ष या लेखनाने वेधून घेतले. त्यानंतर लोककथा- 78, दुभंग, अश्वमेध, माझं काय चुकलं?, जावाई माझा भला, चार दिवस प्रेमाचे, घर तिघांचं हवं, खोल खोल पाणी, इंदिरा अशा कितीतरी नाटकांनी नाट्यरसिकांच्या मनात घर केले. अलीकडेच अलबत्त्या-गलबत्त्या, निम्मा शिम्मा राक्षस ही बालनाटय़े नव्याने रंगभूमीवर आली आणि मुलांची आवडती झाली. संभाजीनगर येथे विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाने अलबत्त्या-गलबत्त्याचे सलग आठवडाभर नाट्यप्रयोग केले. नाट्य कलावंत वैभव मांगले यांनी साकारलेले हे नाट्यप्रयोग, यावर्षी जानेवारी महिन्यात तुफान गाजले होते. मतकरी यांचे महत्त्वाचे नाटक म्हणजे महाभारताच्या अंतिम पर्वावर आधारित ‘आरण्यक’ होय. या नाटकांनी रंगभूमी गाजवून सोडली. मोठय़ांसाठी सत्तरेक नाटकं, लहान मुलांसाठी बाविसेक बालनाट्य, वीसेक कथासंठाह, अनेक एकांकिका, तीन कादंबऱ्य़ा, बारा लेखसंठाह एवढी विपुल साहित्य संपदा आता केवळ आठवणीतच असेल. गहीरे पाणी, अश्वमेध, बेरीज-वजाबाकी या मालिका आजही दर्शकांच्या कायम स्मरणात आहेत. वास्तवाचे भान देणारा गूढकथा हा कथा प्रकार मतकरी यांनी एकहाती वाचकांपर्यंत पोहोचवला आणि काही नाटकांतून त्याचा प्रत्यय नाट्यरसिकांनी घेतलेला असावा. कसदार नाटकं, प्रायोगिक नाट्यकृती ही तर त्यांची महत्त्वाची ओळख आहेच. पण त्याचसोबत त्यांनी मराठी साहित्यात गूढकथा हा वाङ्मय प्रकार लोकप्रिय केला आहे. गेल्या पन्नासेक वर्षांत त्यांनी केलेले विविधांगी लेखन वाचकांसमोर आहेच. प्रौढांसाठीही त्यांनी अनेक  परिकथा लिहिल्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तब्बल अठरा कथासंठाहांमधून त्यांनी विविध गूढकथा लिहिल्या. त्यात प्रामुख्याने खेकडा, निजधाम, काशी बखळ, कबंध, संभ्रमाच्या लाटा, मध्यरात्रीचे पडघम, रंगाधळा, मृत्युंजयी, एक दिवा विझवताना, स्वप्नातील चांदणे, संदेह, अवचिन्ह, ऐक… टोले पडताहेत, अंश, हसविता हसविता, रंगयात्री, बारा पसतीस, निर्मनुष्य अशा गूढकथा संठाहाचा आगत्याने उल्लेख करावा लागेल. वैविधता, आशय सूत्र, अनुभव विश्व, अतिमानुषतेचे स्वरूप. या अंगाने या कथांचा विचार केला तर त्या ठराविक असा अर्थ प्रगट करीत नाहीत. मतकरी यांनी अतिमानुषी तत्त्व असलेल्या गूढ कथांमध्ये लोकसाहित्यातील लोकजीवन, लोकसंस्कृती, लोकभ्रम, लोकसमजुती याचा पुरेपूर वापर केलेला आहे. लोकपरंपरेमधील भूत-पिशाच्यांच्या कल्पना, वर्तनाची पद्धती, व्यवहार हे मांडताना किंवा कथा निर्मिती करताना आधुनिक विचारच मांडला आहे. गूढकथेच्या माध्यमातून त्यांनी मानवी अंतरंगाचा अचूक वेध घेतला आहे. महाराष्ट्रात बालरंगभूमी रुजविण्याचे खरे श्रेय जाते, ते रत्नाकर मतकरी यांच्याकडे. तीसेक वर्षे पदरमोड करून त्यांनी अनेक बालनाट्यांची निर्मिती केली. एवढेच नाही तर झोपडपट्टीतील मुलांनाही बालनाट्याची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने त्यांनी मुलांना नाटक शिकविले. त्यांच्या संस्थेत ज्यांनी आपल्या अभिनयाचे धडे गिरविले ते दिलीप प्रभावळकर, वसंत सोमण, अजय वढावकर, सुप्रिया मतकरी अशा कलावंतांनी आपल्या सकस, दर्जेदार अभिनयाने रंगभूमी गाजवली. बालनाट्यात विशेषत: अलबत्त्या गलबत्त्या, अचाट गावची अफाट मावशी, निम्मा शिम्मा राक्षस, सरदार वाकडोजी फाकडे, इंद्राचे आसन आणि नारदाजी शेंडी, धडपडे, बडबडे, मारकुटे आणि कंपनी अशा कितीतरी बालनाट्यांनी मुलांचे मनोरंजन केले. बालरंगभूमीच्या सशक्त आणि समृद्ध होण्यासाठी मतकरी यांचे लेखन योगदान कुणीही विसरणार नाही. मतकरी हे असे लेखक होते की, त्यांना साहित्य अकादमीचे दोन पुरस्कार लाभले. नाट्यक्षेत्रातील भरीव आणि ठसठशीत योगदानासाठी संगीत नाटक अकादमीचा सन्मान आणि बालनाट्य लेखन व योगदानासाठी साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार. विविध वाङ्मय प्रकार कसदार लेखनाने लोकप्रिय करणारे मतकरी. भाषा व्यवहारातली आणि नाटकातली या ‘ललित’मधील 2010 च्या दिवाळी अंकातील लेखात म्हणतात ‘न बिघडलेली मराठी भाषा आज जर कुठे ऐकायला मिळणार असेल तर ती चित्रपटात नाही, चित्रमालिकेत नाहीच नाही. केवळ आजच्या रंगभूमीवरच! कारण भाषा टिकवून ठेवण्याचे रंगभूमी हे एक प्रभावी माध्यम आहे.’

रत्नाकर मतकरी यांच्या जाण्याने साहित्य आणि नाट्य क्षेत्राचे तर नुकसान झालेच आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाने त्यांचे झालेले निधन खरोखरच मनाला चटका लावणारे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या