ठसा: संगीतऋषी पंडित भाई गायतोंडे

128
bhai gaitonde tabla pandit

पंडित सुरेश उपाख्य भाई गायतोंडे! संगीत क्षेत्रातलं ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व. देशभरातील सुमारे पन्नासहून अधिक संस्थांनी सन्मानित केलेलं आणि सर्वोच्च मानला जाणारा संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरवलेले भाई गायतोंडे म्हणजे ठाण्याचे रत्न. अगदी साधा पेहराव, चेहऱ्यावर स्मितहास्य, हातात पंचविशीतल्या तरुणाचं बळ आणि कसलाही आविर्भाव न आणता अगदी स्वच्छंद मनाने तबल्यावर ताल धरत आपल्याच विश्वात गर्क असलेला एक निष्ठावंत तबलापटू… भाईंच्या निधनाने एका संगीतऋषीने स्वर्गारोहण केलं आहे.

ठाण्यात स्थायिक झालेले भाई मूळचे कोकणातले. कणकवली-कुडाळ भागातले. त्यांचा जन्म 1932 मधला. भाईंचे वडील व्यवसायाने डॉक्टर होते. लहानशा गावातच दवाखाना चालवणारे डॉक्टर हे स्वतः पेटी उत्तम वाजवायचे, गाण्याला साथसंगतही करायचे. त्यामुळे संगीताचा माहोल भाईंच्या घरात होता. ती आवड भाईंनाही लागली आणि त्यांनी तबला शिकण्यास सुरुवात केली. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षापासून भाईंनी शास्त्रीय गायकांना सहजतेनं आणि तेवढ्याच आत्मविश्वासानं साथ केली. पुढे कोल्हापुरात इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असताना त्यांना जगन्नाथबुवा पुरोहित हे गुरू म्हणून लाभले. भाईंना उस्ताद अहमदजान थिरखवाँ खाँसाहेब यांचीही तालीम मिळाली. पेणचे विनायकबुवा घांग्रेकर यांच्याकडे भाई झपतालातल्या खासियती शिकण्याकरता गेले आणि तिथं त्यांनी तालीम घेतली.

भाईंचा आपल्या गुरूंव्यतिरिक्त, घराण्याव्यतिरिक्त इतरही अनेक दिग्गजांचा आणि घराण्यांचा अभ्यास आहे. भाई आमिर हुसेनखाँसाहेबांकडे कधी शिकले नाहीत, पण खाँसाहेबांचा भाईंवर फार जीव!

अल्लारखाँसाहेबांचं भाईंवर प्रेम होतं. कुमार गंधर्वांनी भाईंच्या तबल्यावर मनापासून प्रेम केलं. उस्ताद झाकीर हुसेन, सुरेश तळवलकर, विभव नागेशकर यांच्यासारखी दिग्गज मंडळी भाईंना मानत. अर्जुन शेजवळांसारखे थोर पखवाजिया भाईंचा आदर करत. अलीकडच्या पिढीतले ओंकार गुलवडी, योगेश समशी यांच्यासारखे गुणी तबलजी भाईंकडे आदर्श म्हणून पाहत. याचं कारण एकच, ते म्हणजे भाईंचा रियाज आणि तबल्यावरचा विचार. भाईंनी अनेक मोठमोठय़ा गवयांना साथ केली आहे. त्यात रामभाऊ मराठे, कुमार गंधर्व, यशवंतबुवा जोशी यांची नावं आवर्जून घ्यावी लागतील. भाईंचं नाव एकल तबलावादनात विशेषत्वानं घेतलं जाई.

तबलावादन ही कला नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी देशातील अनेक विद्यापीठांमध्ये ज्ञानदानाचे कार्य केले. लखनौ, दिल्ली येथील अनेक विद्यापीठांसह अमेरिका, ऑस्ट्रेलिया येथील विद्यापीठांमध्ये ते मानद व्याख्याते म्हणून कार्यरत होते. काशी येथील गांधर्व महाविद्यालयात या वर्षी 15 जून रोजी त्यांनी अखेरचे व्याख्यान दिले. विद्यापीठांसह राहत्या घरीही त्यांनी सुमारे अडीचशेहून अधिक विद्यार्थ्यांना तबल्याचे विनामूल्य प्रशिक्षण दिले. वयाच्या 85 व्या वर्षापर्यंत त्यांचे हे कार्य सुरू होते. ‘तबल्याचं सौंदर्यशास्त्र’ या विषयावर त्यांचा अभ्यास होता तबलावादन या विषयावर त्यांची अनेक पुस्तके लिहिली. संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना अनेक मानसन्मान लाभले. दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीनेही त्यांना पुरस्कार देऊन गौरविले. ऋषितुल्य भाईंची तुला त्यांच्या शिष्यांनी एका वाढदिवसानिमित्त केली. त्यात भाईंच्या वजनाइतके तबले त्यांना भेट म्हणून मिळाले. ‘कलाउपासक म्हणजे काय? याचे उत्तर भाईंनी आपल्या कर्तृत्वाने दाखवून दिले. शंभरहून अधिक स्मृतिचिन्हे, प्रशस्तिपत्रे आणि पुरस्कार हीच भाईंची कमाई. खणखणीत, धारदार आणि ताकदीचे तबलावादन यामुळे भाईंनी आपला ठसा संगीत क्षेत्रात उमटवला. संगीत अभ्यासाच्या जोरावर तबल्यासारख्या तालवाद्यात सुरेल नादमयता आणली. भाई गायतोंडे यांच्या तबल्याची ही जादू संगीत क्षेत्रातील जुन्या-नव्या पिढीवर नेहमीच यादगार राहील.

आपली प्रतिक्रिया द्या