ठसा –  गिरिजा कीर

559

>> प्रशांत गौतम

महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक पटलावर आपल्या लेखन व कार्याची मुद्रा उमटवणार्‍या लेखिका तथा सामाजिक कार्यकर्त्या गिरिजा कीर यांच्या निधनामुळे दोन्ही क्षेत्रांची हानी झाली आहे. साठोत्तरी काळातील मराठीतील महत्त्वाच्या स्त्री लेखिका म्हणून त्यांना ओळख लाभली आणि विविध सामाजिक कार्यातून ती ओळख सर्वदूर पोहोचली. म्हणूनच त्यांच्या लेखनास सामाजिक अधिष्ठान लाभले. वाचकप्रियता आणि लोकप्रियता त्यांना तर लाभत होतीच; पण त्यातच अडकून न पडता त्या सातत्याने नावीन्यपूर्ण, वैविध्यपूर्ण लेखन करीत असत.

अगदी वयाच्या 86 व्या वर्षापर्यंत हा प्रवास सुरूच होता. या वर्षीच्या अनेक दिवाळी अंकांत त्यांच्या साहित्य लेखनाची आवर्जून उपस्थिती होती. लोकप्रियतेच्या प्रवाहात वाहवून न जाता लेखन, भटकंती आणि सामाजिक कार्य यातच त्या व्यस्त असत. स्वतंत्रपणे वेगळे विषय शोधणे, त्यात संशोधन करणे, समाजातल्या विविध घटकांतील माणसांशी प्रत्यक्ष भेटून लेखन करणे, समाजातल्या शेवटच्या माणसाच्या वेदना, अडीअडचणी, प्रश्न जाणून घेऊन ते साहित्य लेखनात मांडणे हा त्यांचा महत्त्वाचा गुणविशेष सांगता येतो. लेखन असो की सामाजिक कार्य असो, त्यानिमित्ताने त्यांनी सर्वदूर प्रवास केला. प्रवासात त्यांना वेगवेगळी माणसं भेटली, त्यातून त्यांना अनुभवाची शिदोरी मिळत गेली आणि तेच पुढे विविध पुस्तकांतून वाचकांपर्यंत जात राहिले.

साहित्य निर्मितीच्या क्षेत्रात कथा, कादंबरी, प्रवासवर्णन, मुलाखती, ललित लेखन, व्यक्तिचित्रण, चरित्रलेखन, संतसाहित्य अशा विविध प्रांतांतून त्यांनी आपल्या लेखनाची अमिट  छाप सोडली. ज्या काळात जादूची सतरंजी, राक्षसाचे युद्ध अशा प्रकारच्या बालसाहित्याचा काळ होता, त्या काळात एवढे सर्व साहित्य प्रकार लिहिते करून बालसाहित्याच्या समृद्ध आणि संपन्नतेकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन विपुल लेखन केले व बाल-कुमारवयात असणार्‍या मुलांचे बौद्धिक, भावनिक संगोपन करण्याचा प्रयत्न केला. बालसाहित्याच्या क्षेत्रात मौलिक लेखन-योगदानाचा अनेक मान-सन्मान पुरस्कारांनी गौरव झाला आणि अ.भा. मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले.

गिरिजा उमाकांत कीर या माहेरच्या रमा नारायण मुदवेडकर. 5 फेब्रुवारी 1933 रोजी कर्नाटक राज्यातील धारवाड येथे त्यांचा जन्म झाला आणि वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. त्यांनी वयाची ऐंशी वर्षे पार केली त्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या एका स्नेहय़ाने संकेतस्थळ सुरू करून त्यांचे विपुल साहित्य लेखन आणि सामाजिक कार्य जगासमोर आणले आणि त्या नव्या माध्यमाशी जोडल्या गेल्या. अगदी सुरुवातीच्या काळात गिरिजा कीर यांनी स्त्रीवादी लेखन करून महिलांच्या भावविश्वातील विविध समस्यांना वाचा फोडली. 1968 ते 1978 म्हणजे दशकभराच्या काळात त्यांनी ‘अनुराधा’ मासिकात सहसंपादकाची भूमिका बजावली. मासिकाचे माध्यम हाती असताना त्यांनी सामाजिक प्रश्नांचा शोध घेण्यासाठी कामगार वस्ती, कुष्ठरोग्यांची वस्ती आणि आदिवासी भागात प्रत्यक्ष जाऊन संशोधनात्मक, सामाजिक लेखन केले, त्यांचे जीवन जवळून अनुभवले आणि त्यातून विविध पुस्तकांचे लेखन केले. म्हणूनच त्यांच्या विविधांगी लेखनात अनेक व्यक्ती येत गेल्या. गाभार्‍यातील माणसं, जगावेगळी माणसं, कलावंत, साहित्य सहवास अशी व्यक्तिचित्रणाची पुस्तके याची साक्ष देतात. माणसांच्या संदर्भात एक महत्त्वाचे पुस्तक म्हणजे ‘आयुष्यभराची जन्मठेप’ हे सांगता येईल. अलीकडेच प्रसिद्ध झालेले हे पुस्तक कीर यांनी सहा वर्षे येरवडा तुरुंगातील कैद्यांवर संशोधन करून लिहिले आहे. या संशोधनात्मक पुस्तकातून त्यांनी कैद्यांची मानसिकता, भावनिकता वस्तुनिष्ठपणे फार प्रभावीपणे मांडली आहे, तर चरित्रलेखन यासारख्या साहित्य प्रकारातून श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, संत गाडगेबाबा, महात्मा जोतिबा फुले यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेऊन बहुआयामी लेखन केले आहे.

गिरिजा कीर यांनी आपल्या 86 वर्षांपर्यंतच्या प्रवासात सुमारे 115 पुस्तकांचे लेखन केले आणि देशविदेशात दोन हजारांवर कथाकथनाचे प्रयोग सादर केले. विविध साहित्य संमेलनात त्या कधी अध्यक्ष, उद्घाटक म्हणून सहभागी असत, तर बहुतांश वेळा कथाकथन कार्यक्रमात सादरीकरण त्या करीत असत. अनेक पुस्तकांना पुरस्कार लाभले. लेखनकार्याचा विविध मानसन्मानाने गौरव झाला. मानधनापोटी मिळालेली रक्कमही त्यांनी वंचित मुलांसाठी खर्च केली. मागच्या पिढीत मासिक ही संकल्पना खूप लोकप्रिय होती आणि त्या मासिकातून ज्या ज्या लेखिका त्या काळात प्रसिद्ध झाल्या, त्यातील एक म्हणजे गिरिजा उमाकांत कीर होत. चौफेर लेखन करणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आता चिरंतनाच्या प्रवासाला गेले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या