
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
पासवर्डचा डेटा पुन्हा एकदा चोरीला गेल्यानंतर ‘फेसबुक’ हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पुरताच भांबावला आहे. म्हणूनच तर यूजर्सच्या कोणत्याही आक्षेपार्ह पोस्टची ते तपासणी करायला लागले आहेत. या व्हेरिफिकेशनसाठी फेसबुकने घरोघर माणसे पाठवायला सुरुवात केली आहे असे दिसते. मार्क जुकरबर्ग यांची मालकी असलेल्या फेसबुकला सध्या जोरदार टीकेला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच हिंदुस्थानातील यूजर्सचे व्हेरिफिकेशन करायची वेळ त्यांच्यावर आली आहे.
फेसबुकने आपल्या एका हिंदुस्थानी यूजर्सच्या घरी आपला प्रतिनिधी पाठवून काही गोष्टी तपासण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जातेय. या यूजरच्या फेसबुक अकाऊंटवर आलेल्या पोस्टस् या यूजरनेच केल्या आहेत का हे तपासण्याचा त्यांचा उद्देश होता. या यूजरने आपल्या फेसबुक खात्यावर एक राजकीय पोस्ट टाकली होती. त्यामुळे फेसबुकचा प्रतिनिधी तपासणीसाठी आला होता म्हणे. या प्रतिनिधीने यूजरकडे आधारकार्डच मागितले आणि त्याचे ओळखपत्रही तपासले.
यूजर्सच्या प्रायव्हसीचे उल्लंघन
व्हेरिफिकेशनसाठी फेसबुकने आपल्या यूजर्सच्या घरी जायला सुरुवात केली असली तरी ‘इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट-2000’अन्वये फेसबुकची ही क्रिया म्हणजे सरळ सरळ यूजर्सच्या प्रायव्हसीचे उल्लंघन असल्याचे म्हटले जात आहे. अशा प्रकारे व्हेरिफिकेशन करण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारला आहे. फेसबुक फार तर यूजर्सचे पेज तात्पुरते स्थगित करू शकते किंवा एखादी पोस्ट आक्षेपार्ह वाटली तर फेसबुक ती थेट डिलीटही करू शकते. सर्वोच्च न्यायालयानेही गेल्याच सप्टेंबरमध्ये म्हटले आहे की, खासगी क्षेत्रातील कंपन्यांना लोकांचे आधारकार्ड तपासून पाहण्याचा अधिकार नाही.


























































