
सरकारी पातळीवर भ्रष्टाचार किती केला जातो याचा आणखी एक पुरावा समोर आला आहे. ओडिशातील संबलपूर जिह्यातील तहसीलदाराला 15 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडले आहे. अश्विनी कुमार पांडा असे या तहसीलदाराचे नाव असून अश्विनी कुमार कोणी साधासुधा तहसीलदार नाही, तो 2019 मधील ओडिशा नागरी सेवा परीक्षेतील टॉपर आहे.
2019 मध्ये नागरी सेवा परीक्षेचा निकाल लागल्यानंतर अश्विनी कुमार हा सर्वात जास्त मार्प मिळवून टॉपर बनला होता. त्यानंतर त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. त्यानंतर अश्विनी कुमारची तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली. सध्या संबलपूर जिह्यातील बामरा येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या अश्विनी कुमार पांडाने जमीन नावावर करण्यासाठी एका शेतकऱयाकडे 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. शेतकऱ्याने 20 हजार रुपये देता येणार नाही, असे सांगितल्यावर पांडाने लाचेची रक्कम 15 हजार रुपये केली. पांडाने शेतकऱ्याला धमकीसुद्धा दिली. जर पैसे दिले नाही तर काम होणार नाही. पांडाच्या धमकीनंतर शेतकऱयाने लाचलुचपत विभागाशी संपर्प साधून याविरोधात तक्रार दिली. त्यानंतर लाचलुचपत विभागाने अश्विनी कुमार पांडा याला अटक केली.
तहसीलदार सापळ्यात अडकला
लाचलुचपत विभागातील अधिकाऱयांनी तहसीलदाराला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला. तहसीलदार अश्विनी कुमार पांडाने ड्रायव्हर पी. प्रवीण कुमारला लाचेची रक्कम आणण्यासाठी पाठवले. ड्रायव्हरने तक्रारदार शेतकऱयाकडून 15 हजार स्वीकारताच अधिकाऱयांनी त्याला रंगेहाथ पकडले. त्यानंतर तहसीलदाराला अटक केली. तहसीलदाराच्या घरी धाड टाकल्यानंतर घरात 4.73 लाख रुपयांची रोकड मिळाली. हे पैसे कुठून आले हे पांडाला सांगता आले नाही.