Odisha Train Accident अपघातानंतर दिसली माणुसकी, रक्तदानासाठी तरुणांची रुग्णालयात झुंबड

ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील कोरोमंडल ट्रेन दुर्घटनेत शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला तर हजारो नागरिक जखमी झाले. या अपघातात अनेक मृतदेहांची विटंबना झाली, तर काही लोकांच्या अंगातून रक्तस्त्राव होत होता. जखमींना लागणाऱ्या रक्ताची गरज लक्षात घेत बालासोर मेडिकल कॉलेजमध्ये रक्तदानासाठी शेकडो तरुणांनी गर्दी केली होती. सकाळपासून येथे अनेकांनी रक्तदान केले. तर 2000 हून अधिक तरुणांनी रक्तदानासाठी नोंदणी केली. अपघातानंतर लोकांनी दाखवलेल्या या माणुसकीचे देशभरात कौतुक होत आहे.

रात्री 12 वाजल्यापासूनच ओडिशातील बालासोर मेडिकल कॉलेजमध्ये हजारो लोक जमले होते. गोंधळाचे वातावरण होते. लोक इकडे तिकडे धावत होते. रुग्णवाहिकेचे सायरन अखंडपणे वाजत होते. जखमींना सतत कार आणि इतर वाहनांतून आणले जात होते. दरम्यान, येथे काही सुदृढ तरुणांचीही गर्दी जमली होती. लांबच लांब रांग होती. काही तरुणांच्या हातात फॉर्म होते. काही 2 तास उभे होते तर काही 4 तास उभे होते. मेडिकल कॉलेजमध्ये रक्तदान करण्यासाठी आलेले हे तरुण होते. अपघाताची बातमी ऐकल्यानंतर आणि रेल्वे अपघाताचा व्हिडिओ पाहिल्यानंतर हा अपघात खूप मोठा असल्याचे या तरुणांना स्पष्ट झाले. अनेकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत, त्यांना रक्ताची गरज भासणार आहे, त्यामुळे ते रक्तदान करण्यासाठी येथे पोहोचले.

बालासोर येथील भीषण रेल्वे अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. घटनेनंतर लोकांचे प्राण वाचवण्यासाठी लोक बचाव कार्यात गुंतले. अपघातस्थळी बचावकार्य सुरु असताना रुग्णालयातही रक्तदान करण्यासाठी गर्दी झाली होती. त्यामुळे अवघ्या काही तासांत 900 युनिट रक्त जमा झाले. नजर जाईल तिथपर्यंत तरुण रक्तदानासाठी रांगेत उभे असलेले दिसत होते.

दरम्यान डॉक्टरांनी सांगितले की रक्त जास्त प्रमाणात साठवता येत नाही, त्यामुळे 900 युनिट रक्त जमा झाल्यानंतर रक्तदान थांबवण्यात आले. त्यानंतर तरुणांनी रक्तदानासाठी नोंदणी करण्यास सुरुवात केली. 2000 हून अधिक नोंदणी झाली. कोणत्याही रक्तदान शिबिराशिवाय किंवा कोणाच्याही हाकेला न जुमानता शेकडो तरुण रक्तदानासाठी एकत्र आले, यावरून आपल्या देशात माणुसकी जिवंत असल्याचे दिसून येत आहे.