
सामना प्रतिनिधी । पिंपरी
टपऱ्या तयार करणाऱ्या फॅब्रिकेशन व्यावसायिकाला त्रास देऊन त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेविकेसह तिचा पती आणि व्यावसायिकाच्या पत्नीसह पाचजणांवर पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी व्यावसायिकाने आपल्याला त्रास देणाऱ्यांच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यानुसार, हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन सुरेश ढवळे (वय ४४, रा. संत तुकारामनगर, शनी मंदिराजवळ, पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी भाजप नगरसेविका सुजाता सुनील पालांडे (वय ४५, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) त्यांचा पती सुनील पालांडे, कार्यकर्ते अमय बिरजे, विकी शर्मा आणि सचिन यांची पत्नी शशिकला (वय ४०) या पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन यांचा भाऊ शरद ढवळे (वय ३८, रा. विजयनगर, नाशिक) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सचिन यांचा संत तुकारामनगर येथे धनश्री फॅब्रिकेशन या नावाने व्यवसाय होता. पत्नी, पाच आणि दीड वर्षाच्या मुलासह ते राहत होते. डिसेंबर २०१६मध्ये वल्लभनगर एस. टी. बसस्थानक परिसरात हॉकर्स झोन होणार असल्याने परिसरातील सुमारे ३० टपरीधारकांनी सचिन यांच्याकडे टपऱ्या बनविण्यास दिल्या होत्या. त्यासाठी त्यांनी टपरीधारकांकडून प्रत्येकी २८ ते ३० हजार रुपये घेतले होते. मात्र, काही कारणाने हॉकर्स झोनचा निर्णय झाला नाही. त्यामुळे या टपऱ्या एका ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या. सचिन यांना टपरी बनविलेल्या काही लोकांचे पैसे देणे-घेणे बाकी होते.
दरम्यान, २० मार्च रोजी या बनवून ठेवलेल्या टपऱ्या भाजप नगरसेविका सुजाता पालांडे यांच्यासह त्यांचे पती सुनील आणि कार्यकर्ते अमेय व विकी यांनी परस्पर दुसरीकडे उचलून नेल्या. त्यामुळे टपरीधारकांनी सचिन यांच्याकडे टपरी आणि पैशासाठी तगादा लावला होता. सचिन यांनी पालांडे यांच्याकडे टपऱ्या देण्याची मागणी केली असता त्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना दमदाटी केली. त्यातच तगादा लावणाऱ्यांमुळे पत्नी शशिकला हीसुद्धा सचिन यांच्याशी वाद घालत असे. अखेर हा त्रास सहन न झाल्याने सचिन यांनी सोमवारी पहाटे राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.
दरम्यान, यासंदर्भात सचिन यांची पत्नी शशिकला यांनी ९ एप्रिल रोजी भाजप नगरसेविकेसह त्यांचा पती आणि कार्यकर्त्यांकडून पती सचिन यांना होणाऱ्या त्रासाबद्दल पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. मात्र, पोलिसांनी या अर्जावर कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला. याप्रकरणी पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव यांना विचारले असता तक्रार अर्जावर चौकशी करण्यात आली होती, असे सांगितले. तसेच या आत्महत्येप्रकरणी सुसाईड नोटनुसार भारतीय दंड विधान ३०६, ३४ या कलमाप्रमाणे आरोपींनी संगनमताने सचिन यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
































































