
कोल्हापूरमधील माधुरी हत्तीण वनतारामध्ये नेण्यात आल्यामुळे कोल्हापूरकरांच्या भावना दुखावल्या. त्यानंतर कोल्हापूरकरांनी निषेध नोंदवत माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी मोहीम हाती घेतली. परंतु माधुरी हत्तीण सुखरुप असल्याचा व्हिडिओ वनताराकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. कोल्हापूरकरांचा रोष लक्षात घेत वनताराकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे.
काय आहे निवेदनात?
- माधुरी कोल्हापुरातच रहावी अशी इच्छा आणि आपुलकी व्यक्त करणाऱ्या भक्त, मठाचे नेते आणि लोकांच्या भावनांची पूर्ण जाणीव आणि कदर आम्ही करतो.
- माधुरीला हलविण्याचा निर्णय न्यायालयाने त्यांच्या अधिकारात घेतला होता. स्वतंत्रपणे चालवलेले एक बचाव आणि पुनर्वसन केंद्र म्हणून त्यात वनताराची भूमिका केवळ माधुरीची देखभाल करणे, तिला पशुवैद्यकीय सहाय्य पुरविणे आणि तिच्या निवासाची व्यवस्था करणे अशी होती.
- माधुरीला कोल्हापूरला परत आणण्यासाठी मठ आणि महाराष्ट्र सरकार यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर केलेल्या कायदेशीर अर्जास वनतारा पूर्ण पाठींबा देईल.
- मठ आणि राज्य सरकारशी समन्वय साधून कोल्हापूर नजीकच्या नांदणी परिसरात वनतारा माधुरीसाठी दूरस्थ पुनर्वसन केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव वनताराने मांडला आहे.
- मठाचे परमपूज्य भट्टारक महास्वामीजी आणि महाराष्ट्र शासन यांच्याशी चर्चा करून या सुविधेसाठी जागा निश्चित केली जाईल.
आमचा सहभाग केवळ न्यायालयीन निर्देशानुसार असला तरी, जैन समुदायाला किंवा कोल्हापूरच्या लोकांना त्यामुळे काही त्रास होत असेल तर आम्ही मनःपूर्वक खेद व्यक्त करतो. मिच्छामी दुक्कडम — जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे आमचे विचार, शब्द किंवा कृतीने तुम्हाला दुखावले असेल, तर त्यासाठी आम्ही तुमची क्षमा मागतो.