हिंदुस्थानी खेळाडूंच्या आहार भत्त्यात कपात, ऑलिम्पिकपूर्वी खेळाडूंच्या तयारीला धक्का

380

आगामी वर्षी होणाऱया ऑलिम्पिक स्पर्धेला जेमतेम नऊ महिन्यांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे खेळाडूंनी केवळ या स्पर्धेवर लक्ष्य केंद्रित केले असून ते आता फक्त मैदानावर घाम गाळत आहेत. मात्र ऑलिम्पिक स्पर्धेचे काऊंटडाऊन सुरू झालेले असताना हिंदुस्थानी खेळाडूंच्या तयारीला धक्का बसलाय. ‘साई’कडून त्यांना मिळणाऱ्या आहार भत्त्यात कपात करण्यात आल्याने खेळाडूंच्या तयारीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

पन्नास टक्क्यांहून अधिक भत्ता कापला
आहार भत्त्यात 50 टक्क्यांहून अधिक कपात झाल्याने ‘साई’ सेंटरमधील अधिकाऱ्यांनी खेळाडूंच्या सप्लीमेंट बंद केल्या आहेत. ताकदीच्या खेळातील खेळाडूंना प्रतिदिन 1,440 रुपये आहार भत्ता दिला जात होता. यात 690 रुपये जेवणासाठी, तर 750 रुपये फूड सप्लीमेंटसाठी देण्यात येत होते. मात्र हेच पैसे आता घटवून 375 रुपये करण्यात आले आहेत. ‘साई’च्या प्रमुखांकडे विनंती करूनही सप्लिमेंट मिळत नाहीये.

खेळाडू घेताहेत बाहेरची सप्लिमेंट
ऍथलेटिक्स, बॉक्सिंग, कुस्ती, वुशू आदी पॉवरफुल खेळांसह इतर काही खेळांतील खेळाडूंना राष्ट्रीय शिबिरात ‘साई’कडून जेवण आणि फूड सप्लीमेंट दिले जाते. मात्र ‘साई’च्या नव्या नियमानुसार आता खेळाडूंना जेवण आणि सप्लीमेंटसाठी प्रतिदिन 375 रुपये आणि 320 दिवसांच्या हिशोबाने वर्षभरासाठी 1 लाख 20 रुपये दिले जात आहेत. पूर्वी जेवणासाठी खेळाडूंना 690 रुपये मिळायचे. फूड सप्लीमेंटसाठी 70 किलोहून अधिक वजनी गटातील खेळाडूंना 750 रुपये तर त्याहून कमी वजन असलेल्या खेळाडूंना 430 रुपये मिळत होते, मात्र नव्या आदेशामुळे आहार भत्त्यात कपात झाल्याने खेळाडूंना सप्लीमेंट मिळणे आता बंद झाले आहे. त्यामुळे नाईलाजाने खेळाडूंना बाहेरील सप्लीमेंट घ्यावे लागत आहेत. त्यामुळे आता खेळाडूंवर डोपिंगमध्ये सापडण्याची भीती निर्माण झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या