हिंदुस्थानचे आठ पुरुष बॉक्सर ऑलिम्पिक पात्रता फेरी खेळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचे आठ पुरुष बॉक्सर ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी चीनला जाणार आहेत. ऑलिम्पिक खेळण्याचा अनुभव असलेले विकास क्रिशन व गौरव सोलंकी यांच्यासह नमन तंवर या तीन बॉक्सर्सनी सोमवारीही ऑलिम्पिक पात्रता फेरीचे तिकीट मिळवले. त्याआधी अमित फांगल (52 किलो), मनीष कौशिक (63 किलो), आशीष कुमार (75 किलो), सचिन कुमार (81 किलो), सतीश कुमार (91 किलोहून अधिक) यांनीही ऑलिम्पिक पात्रता फेरीचे तिकीट बुक केलेले आहे. वुहानमध्ये (चीन) 3 ते 14 फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा होणार आहे.

विकास क्रिशनने सोमवारी 69 किलो गटातील अंतिम लढतीत दुर्योधन सिंह नेगीचा 9-0 गुणांनी धुव्वा उडवला. आशियाई स्पर्धेत पदक जिंकणारा विकास प्रदीर्घ काळापासून 75 किलो गटात खेळत होता. मात्र पाठीच्या दुखापतीतून सावरल्यानंतर त्याने 69 किलो गटातून पुनरागमन केले. गौरव सोलंकीने 57 किलो गटात मोहम्मद हुसामुद्दीचा 7-2 असा पराभव करून ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेचे तिकीट मिळवले.

त्याआधी रविवारी आशीषने (75 किलो) अंकित खटानाचा 9-0 फरकाने पाडाव करून तर सतीश कुमारने नरेंदरचा 6-3 गुणांनी पराभव करून ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेची पात्रता मिळवली. याचबरोबर सचिन कुमारनेही 81 किलो गटात ब्रिजेश यादवला हरवून ऑलिम्पिक पात्रता फेरीतील स्थान पक्के केले.

खेळाडूपेक्षा देश महत्त्वाचा!

एमसी मेरी कोम-निखत झरीन यांच्यातील वादाला मीडियाने जास्त महत्त्व देऊ नये. हिंदुस्थानला या दोन्ही बॉक्सर्सबद्दल अभिमान आहे. मेरी कोम एक महान खेळाडू असून तिने खेळात जी उंची गाठली ती अद्याप कोणाला जमलेली नाही. निखत झरीनही प्रतिभावान बॉक्सर असून तिच्यामध्येही मेरी कोमच्या पावलावर चालण्याची क्षमता आहे. जिद्द हा खेळाचा आत्मा असतो. व्यावसायिक खेळात खेळाडू आणि पैसा महत्त्वाचा असतो. मात्र हौशी खेळात खेळाडूपेक्षाही देश महत्त्वाचा असतो. त्यामुळे देशाचे प्रतिनिधित्व करताना आपापसातील भांडणाचा तुमच्या खेळावर प्रतिकूल परिणाम होता कामा नये. – किरेन रिजिजू (केंद्रीय क्रीडा मंत्री)