ओमर अब्दुल्लांना नजरकैदेत का ठेवले? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

793

जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या नजरकैदेवरून त्यांची बहीण सारा अब्दुल्ला यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली असतानाच कश्मीर प्रशासनाने ओमर अब्दुल्ला यांना नजरकैदेत का ठेवले आहे, असा सवाल करत न्यायालयाने प्रशासनाला शुक्रवारी नोटीस बजावली. सारा यांच्या याचिकेवर 2 मार्चला सुनावणी होणार आहे.

न्यायमूर्ती अरुण मिश्रा आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठासमोर ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि प्रसिद्ध वकील कपिल सिब्बल यांनी सारा अब्दुल्ला यांच्यातर्फे याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी व्हावी, असेही सिब्बल यांनी यावेळी म्हटले आहे. त्यानंतर ही सुनावणी 2 मार्चला घेण्याचे खंडपीठाने म्हटले आहे. सारा अब्दुल्ला पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या की, न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. हिंदुस्थानातील इतर नागरिकांना जसे अधिकार मिळतात तसेच आम्हा कश्मिरी लोकांनाही मिळावेत एवढीच आमची अपेक्षा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या