कल्याणची दुर्गाडीदेवी म्हणजे लाखो हिंदूंचे श्रद्धास्थान. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्रोत्सवाची मोठी परंपरा आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने दुर्गाडी किल्ल्यावर भाविकांची मांदियाळी सुरू आहे. नवरात्रीच्या काळात दुर्गाडीवर मोठी जत्रा भरते. या काळात दुर्गाडीदेवीचे दर्शन घेण्यासाठी ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यासह मुंबईतून मोठ्या संख्येने भाविक येत असतात.
पूर्वी दुर्गाडी किल्ल्यावर येण्यास हिंदूंना बंदी घालण्यात आली होती. मात्र हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सरकारचा बंदीहुकूम झुगारून 1967 साली असंख्य शिवसैनिकांसह कूच केले आणि देवीची मोठ्या दिमाखात पूजा केली. यावेळी माँसाहेब मीनाताई बाळासाहेब ठाकरे देखील उपस्थित होत्या. तेव्हापासून शिवसैनिक वाजतगाजत अपूर्व उत्साहात किल्ल्यावर नवरात्र साजरा करतात. यंदाही नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने दुर्गाडी किल्ला आकर्षक विद्युत रोषणाईने उजळला असून पूजा, आरती, होमहवन, भजन, गोंधळ आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. उत्सव काळात किल्ल्याच्या पायथ्याशी भरणारी जत्रा जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. देवीच्या दर्शनासाठी किमान दहा लाख भाविक दर्शनासाठी येतात.