फोन-पेवरून पैसे घेऊन शॉर्टकट मार्गाने दर्शन देणाऱया दलालाचा एका वारकरी भाविकानेच पर्दाफाश केला आहे. माणसी एक हजार रुपये घेऊन या दलालाने भाविकांना शॉर्टकट मार्गाने दर्शनाला सोडले होते. धक्कादायक बाब म्हणजे ज्या भाविकांना शॉर्टकट दर्शन दिले त्याच भाविकांनी मंदिर समिती आणि पोलिसांकडे तक्रार केली आहे.
चेतन रविकांत काबाडी (रा. वाशीम, जि. ठाणे) हे आज सोबत तीन व्यक्तींना घेऊन श्री विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाला आले होते. पदस्पर्श दर्शनासाठी दर्शनरांगेतून सहा ते सात तासांचा वेळ लागत असल्याचे समजल्याने, काबाडी यांनी शॉर्टकट दर्शन मिळेल का, याची चौकशी केली. तेव्हा श्री विठ्ठल मंदिराबाहेर फुलांच्या माळा विक्री करणाऱया सुमित शिंदे याने ‘माणसी एक हजार रुपये द्या, शॉर्टकट मार्गाने लगेच दर्शन देतो,’ असे सांगितले. त्यानंतर शिंदे याने काबाडी यांच्याकडून चार हजार रुपये आपल्या फोन-पेवर घेतले. पैसे घेतल्यानंतर शिंदे याने त्यांना मंदिराच्या व्हीआयपी गेटमधून मंदिरात शॉर्टकट मार्गाने प्रवेश दिला.
काबाडी यांना घाई होती. मंदिर समितीने घाईच्या भाविकांना देणगी घेऊन शॉर्टकट दर्शनाची सोय करायला हवी, असे त्यांना वाटले. दर्शनासाठी आपले पैसे दलालास गेले याचा त्यांना संताप झाला आणि त्यांनी थेट मंदिर समितीचे कार्यालय गाठले. ‘तुम्ही देणगी पावती करून भाविकांना दर्शनाला सोडत नाही. मात्र, दलाल पैसे घेऊन दर्शनाला सोडतात, हा काय प्रकार आहे. माझे चार हजार दलालाने घेतले. हे पैसे मी मंदिराला द्यायला तयार आहे. तुम्ही घाईच्या भाविकांना शॉर्टकट दर्शन व्यवस्था सुरू करा, अशी तक्रार करीत त्यांनी दलालाचा पर्दाफाश करत कारवाई करण्याची मागणी केली.
काबाडी यांनी पुराव्यासह लेखी व तोंडी तक्रार करूनही कोणी दखल घेईना. शेवटी पत्रकारांनी हा विषय लावून धरल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्याबाबत हालचाली सुरू केल्या.
याआधी झाला होता रॅकेटचा पर्दाफाश
z यापूर्वी पेड दर्शन व्यवस्थेबाबत मोठे रॅकेट उघडीस आले होते. पोलीस तपासात दलाल व मंदिर समितीचे आठ सुरक्षारक्षक आणि कर्मचारी दोषी असल्याचे समोर आले होते. मात्र, तत्कालीन मंदिर समितीच्या अध्यक्षांनी हे प्रकरण दाबून टाकले होते. या निमित्ताने मागील आणि या प्रकरणाची चौकशी झाल्यास अनेक दलाल आणि मंदिराचे कर्मचारी उघडे पडतील.