दीड लाख बकरे, हजारो म्हैशी… व्यापारी अन् ग्राहकांची रेलचेल; देवनार बकरा बाजारात हायटेक सुविधांमुळे ना झोल, ना गडबड

>> आशीष बनसोडे

दीड लाख बकरे, नऊ हजार म्हैशी, हजारो व्यापारी आणि ग्राहकांनी देवनारचे पशुवधगृह अक्षरशः हाऊसफुल्ल होत आहे. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या या बकरा मंडईत गडबड, चोऱ्या, अस्वच्छता, फसवणूक असे कुठलेच प्रकार घडलेले नाहीत. पालिकेने जुन्या आणि नव्या पद्धतींची योग्य सांगड घालत राबविलेल्या योजनांमुळे यंदाच्या बकरा बाजारातला कारभार निर्विघ्न सुरू आहे.

बकरी ईदनिमित्त देवनार पशुवधगृहात म्हैस आणि बकऱ्यांच्या बाजाराचे आयोजन केले आहे. 5 जूनपासून भरलेल्या या बाजारात महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व कश्मीर राज्यातील एक हजार 870 व्यापाऱ्यांनी दीड लाखाहून अधिक बकरे विक्रीसाठी आणले आहेत. तसेच राज्यातील जुन्नर, बेल्हे, वडगाव येथील 46 व्यापाऱ्यांनी आठ हजार 195 म्हैशी विक्रीसाठी आणल्या आहेत. यामुळे बकरा बाजार हाऊसफुल्ल झाला आहे. अशा परिस्थितीत बकरे तसेच व्यापाऱ्यांच्या किमती ऐवजांची चोरी होऊ नये, अस्वच्छता  होऊ नये, व्यापारी व ग्राहकांची कुठलीही गैरसोय होऊ नये याकरिता पालिकेकडून उत्तम सुविधा केल्या आहेत. पोलीस यंत्रणा व पालिकेकडून राबविल्या जात असलेल्या आधुनिक यंत्रणांमुळे  गेल्या दहा दिवसांपासून हा बकरी बाजार उत्तम प्रकारे सुरू असल्याचे पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. करीम पठाण यांनी सांगितले.

बाजारात विक्रीसाठी आणलेल्या बकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून क्यूआर कोड पद्धत सुरू करण्यात आली. यामुळे बकरा चोरीच्या प्रमाणात मोठी घट झाली. हीच पद्धत म्हशींसाठीदेखील सुरू करण्यात आली आहे.

बकरे विकल्यानंतर व्यापाऱ्यांकडे मोठय़ा प्रमाणात रोकड येते. ते पैसे चोरीला जाऊ नयेत व वेळीच व्यापाऱ्यांना त्यांचे पैसे सुरक्षित ठेवता यावेत यासाठी पालिकेने खास मनी ट्रान्सफरची योजना उपलब्ध केली आहे.

संपूर्ण बकरा मंडीवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जात आहे. 210 हाय डेफिनेशनचे स्थिर पॅमेरे, सहा चहूबाजूवर नजर ठेवणारे पॅमेरे, 24/7 नियंत्रण कक्ष, एक हजार अधिकारी-कर्मचारी, ठिकठिकाणी पंट्रोल टॉवर उभारण्यात आले आहेत.