माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे म्हणत एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना नेवासा शहरातील नगरपंचायत चौकात शनिवारी दुपारी घडली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून सुमारे नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून अजीज उर्फ कालु याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींवर अॅट्रॉसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील पुढील तपास करीत आहेत.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 1 जून रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास भाजी विक्रेता अजीज ऊर्फ कालु शेख (रा.गंगानगर नेवासा खुर्द) याने माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणुन अंगावरील कपडे फाडुन मला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. माझ्या वडिलांना कालुचे मित्र तालीफ व अनोळखी या दोघांनी खाली पाडुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. माझ्या आईलाही काळु शेखच्या आई, बहिणींनी मारहाण करत शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. तसेच जातीवाचक शिवीगाळही केली. कालु शेखचा भाचा सद्दाम व त्याच्यासोबतच्या अनोळखी 2 जणांनी आपला विनयभंग केला. त्यानंतर माझ्या पतीच्यामागे विट घेवुन पाठलाग केला. औदुंबर चौक नेवासा खुर्द येथील आमच्या हॉटेलवर दगडफेक करुन आमच्या हॉटेलचे नुकसान केले. त्यात माझी मुलीच्या (वय 7 वर्षे) डाव्या पायाच्या घोट्याला दगड मारुन तिलाही जखमी केले, असे तक्रारीत म्हटले आहे.
या तक्रारीवरून अजीज ऊर्फ कालु शेख, त्याची आई, बहिण व त्याचे मित्र तालीफ, त्याचा भाचा सद्दाम यांच्यासह 3 अनोळखी व्यक्तींविरोधात विनयभंग व अॅस्टोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील पुढील तपास करीत आहेत.