मालाडमध्ये सापडले एक दिवसाचे बाळ

प्रातिनिधिक फोटो

दिवाळीमुळे शहर उजळून निघाले असताना मालाडमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली. अज्ञात महिलेने तिच्या एक दिवसाच्या बाळाला रस्त्यावर टाकून पळ काढला. एका वाटसरूला त्या बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्याने याची माहिती बांगूर नगर पोलिसांना दिली.  त्या बाळाला कपड्यात गुंडाळले होते. तिच्या शरीरावर मुंग्या चालत होत्या. वेदनेने ते बाळ रडत होते. त्या बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे बांगूर नगर पोलिसांनी सांगितले. बाळाला दत्तक घेण्यासाठी काहींनी पुढाकार घेतल्याचे समजते.

राकेश माने हे बांगूर नगर पोलीस ठाण्यात काम करतात. शनिवारी रात्री ते मालवणी गेट क्रमांक 5 येथे डय़ुटीला होते. तेव्हा त्यांना पोलीस नियंत्रण कक्षातून मदतीसाठी पह्न आला.  गोरेगाव येथे राहणारे एक जण हे शनिवारी रात्री बॅक रोड येथून जात होते. रात्रीच्या वेळी बॅक रोड येथे फारशी वर्दळ नसते. त्या व्यक्तीला बाळाच्या रडण्याचा आवाज आल्याने तो बसस्टॉपजवळ गेला. तेव्हा त्यांना कपडय़ात गुंडाळलेले स्त्री जातीचे एक दिवसाचे बाळ दिसून आले. त्यानंतर काहीच वेळात पोलीस घटनास्थळी पोहचले. त्या बाळाला रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती स्थिर आहे. बाळाचा त्याग करणाऱ्या व्यक्तीविरोधात बांगूर नगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.