ग्रॅण्ट रोड येथे गुरुवारी सकाळी म्हाडाच्या पाच मजली निवासी इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्याचे बांधकाम कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत दुसऱ्या मजल्याचे छत कोसळून पहिल्या मजल्यावर आल्यानंतर पहिल्या मजल्याच्या छताचा भाग तळमजल्यावर कोसळला. सकाळी 10 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. ग्रॅण्ट रोड येथील मौलाना शौकत अली रस्त्यावरील शालिमार हॉटेलनजीकच्या युनायटेड चेंबर ही पाच मजली म्हाडाची इमारत आहे. या इमारतीमध्ये ही दुर्घटना सकाळी 10 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास घडली. आधी तेथील दुसऱया मजल्याचे छत कोसळले. त्याचा ढिगारा पहिल्या मजल्यावर पडल्यानंतर पहिल्या मजल्याच्या छताचा भाग तळमजल्यावर पडला. त्या ढिगाऱयाखाली सागर शिवाजी निकम (36) जखमी झाले. त्यांना जे. जे. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.