Bomb Blast in Cricket Match – पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यान बॉम्बस्फोट, एकाचा मृत्यू तर अनेक जण जखमी

पाकिस्तानमध्ये क्रिकेटचा सामना सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली. पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामने सुरू असल्यामुळे ते पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. मात्र, या सामन्यादरम्यान बॉम्बस्फोट झाला, त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानी मीडिया एजन्सी ‘डॉन’ नुसार, ही घटना खैबर पख्तूनख्वा प्रांतातील आहे. या स्फोटाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बाजौर जिल्ह्यातील खार तहसीलमधील कौसर क्रिकेट मैदानावर घडली. स्फोटानंतर खेळाडू इकडे तिकडे धावताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत. आठवड्याभरापूर्वीच खैबर पख्तूनख्वा येथील एका पोलीस ठाण्यावर क्वाडकॉप्टरच्या मदतीने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात एक पोलीस हवालदार आणि एक नागरिक जखमी झाला होता.

बाजौर जिल्हा पोलिस अधिकारी वकास रफिक यांनी पाकिस्तानी मीडिया एजन्सी ‘डॉन’ ला सांगितलेल्या माहितीनुसार, ही घटना नियोजन करून घडवून आणण्यात आली आहे. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर काही मुलांसह अनेक लोक जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.