उधारीच्या पैशांवरून झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. त्यावेळी तरुणाने जोराचा धक्का दिल्याने खाली जमिनीवर डोके आपटल्याने त्यात गंभीर दुखापत होऊन भांडुप पोलिसांच्या अभिलेखावर असलेल्या गुन्हेगाराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली.
भांडुपच्या टेंभीपाडा परिसरात राहणारा विजय गौड हा कोकणनगर परिसरात एका रिक्षामध्ये मंगळवारी सकाळी बेशुद्ध अवस्थेत सापडला होता. त्यामुळे त्याला पोलिसांनी अग्रवाल इस्पितळात नेले असता त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. विजय ज्या रिक्षात बेशुद्ध अवस्थेत सापडला त्या रिक्षाच्या पाठीमागील सीटला लागून असलेल्या लाकडी फलाटावर रक्ताचे डाग आढळून आले होते. त्यामुळे भांडुप पोलिसांनी अधिक चौकशी केला असता विजय व त्याचा मित्र सोमवारी रात्री उशिरा भांडुपच्या जनता मार्केट येथे लागणाऱ्या बुर्जीपावच्या गाडीवर गेला होता.
तेथे बुर्जीपाववाला आणि विजय यांच्यात हाणामारी झाल्याचे समजले. त्यामुळे पोलिसांनी बुर्जीपावची गाडी लावणाऱ्या तरुणाकडे चौकशी केल्यावर अशी माहिती समोर आली की, विजय गाडीवर यायचा, बुर्जीपाव खायचा आणि उधारी ठेवायचा. यावरून सूरज गायकवाड आणि विजयमध्ये वाद झाला. यावेळी सूरजने विजयला मारहाण केली. तसेच सूरजने धक्का दिल्याने विजय रस्त्यावर पडला. तेव्हा त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला दुखापत झाली. त्यानंतर विजय रिक्षाने निघून गेला. त्यामुळे पोलिसांनी सूरजविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.