दोन दहशतवाद्यांचा खात्मा होताना एका जवानाला व्हावे लागते ‘शहीद’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
indian-soldier

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

2014 ते 2019 या काळात 2018 या वर्षात दहशतवाद्यांच्या हिंसाचाराने कळस गाठला होता. दोन दहशतवाद्यांचा खात्मा होताना हिंदुस्थानच्या एका जवानाला दरवेळी शहीद व्हावे लागले आहे. ही धक्कादायक वस्तुस्थिती दक्षिण आशियातील दहशतवादी कारवायांचे ‘रेकॉर्डस्’ जपणाऱ्या ‘एसएटीपी’ या वेबसाइटने जगासमोर आणली आहे. 2019 या वर्षाच्या पहिल्या दोनच महिन्यांत दहशतवादी हिंसाचारात 16 जणांचा बळी गेला आहे. 82 दहशतवाद्यांना कंठस्थान घातले गेले असले तरी त्यावेळी 16 नागरिकांनाही जीव गमवावा लागला आहे. 2014 सालानंतर जम्मू-कश्मीरमध्ये चकमक, घुसखोरी, शस्त्रसंधीचे उल्लंघन अशा घटनांमध्ये आजवर जवान, नागरिक आणि दहशतवादी असे दीड हजार लोक मारले गेले आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार 2018 मध्ये सर्वात मोठय़ा प्रमाणावर जीवितहानी झाली. त्यावर्षी एकूण 451 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 270 दहशतवादी, सुरक्षा दलाचे 95 जवान आणि 86 नागरिक होते. 2017 मध्ये 358 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 218 दहशतवादी, सुरक्षा दलाचे 83 जवान आणि 57 नागरिकांचा मृत्यू झाला. कश्मीरमध्ये मानवी हक्कांसाठी काम करणारी संघटना जेकेसीसीएसच्या अहवालानुसार 2014 नंतर दहशतवादाशी संबंधित घटनांमध्ये 522च्या आसपास नागरिकांचा मृत्यू झाला आहे.