वाळूच्या टिप्परने दुचाकीला उडविले, ग्रामविकास अधिकाऱ्याचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । परभणी

परभणी येथील गंगाखेड रोडवरील पिंगळगढ नाल्याजवळ सोमवारी दुपारी सिंगणापूर ग्रामविकास अधिकारी दिलीप सोनेराव देशमुख (54) यांचे अपघाती निधन झाले. एका वाळूच्या भरधाव टिप्परने त्यांच्या दुचाकीला (एम.एच.२२ बी. ७१३१) समोरासमोर धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अत्यंत खराब रस्ता असलेल्या गंगाखेड रोडने आज आणखी एक बळी घेतला. वाळू तस्करांनी याच गंगाखेड मार्गाने लातूरकडे वाळू रात्रंदिवस नेल्याने हा रस्ता खड्डेमय झाला आहे. यामुळे यापूर्वी अनेक अपघात होऊन निष्पाप बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत.

या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु होती. टिप्परला वाळूसह कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुपारी १.३० वाजता सिंगणापूर येथे पी.एम. किसान विकास सन्मान योजनेचे काम आटोपून ग्रामविस्तार अधिकारी परभणीकडे येत होते. त्यांची दुचाकी गंगाखेड रोडवरील शहरालगत पिंगळगड नाल्यालगत येताच समोरून आलेल्या भरधाव वाळूच्या टिप्परने त्यांच्या दुचाकीला उडविले. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. सायंकाळी उशिरापर्यंत परभणी जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येवून त्यांच्या मुळगावी लोहगाव येथे अत्यसंस्कार करण्यात आले.