पहिल्या दरोड्यांचा तपास गुलदस्त्यात, आष्टीत आणखी एक दरोडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । आष्टी

परतूर तालुक्यातील आष्टी येथील दोन महिन्यापूर्वी माजी सरपंच यांच्या घरी पडलेल्या दरोड्याचा तपास गुलदस्त्यात असतांना शनिवार पहाटे आणखी एक दरोडा पडला असून चाकूचा धाक दाखवून सहा लाख ३५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन दरोड्याचा निषेध करत व्यापाऱ्यांनी आष्टी बाजारपेठ बंद ठेवून पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.

आष्टी येथील भांड्याचे व्यापारी असलेले देवीदास ढोके यांचे माजलगाव रस्त्यावर भांड्याचे दुकान व दुसऱ्या मजल्यावर घर आहे. ९ नोव्हेंबर रोजी भाऊबीजेचा कार्यक्रम अटोपून घरातील त्यांच्या पत्नी मुलगा व दिवाळी सनानिमित्ताने आलेली विवाहित मुलगी व तिचे बाळ असे एका खोलीत तर दुसरा मुलगा राम एका खोलीत व देवीदास ढोके हे तिसऱ्या खोलीत झोपले असताना १० नोव्हेंबरच्या मध्यरात्री अडीच वाजता त्यांचा घराच्या पाठीमागून असलेल्या पत्र्यावरून चार चोरट्यांनी किचन रूमच्या खोलीचे, गेटचे व दरवाज्याच्ये कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यांच्या पत्नी- मुलगी झोपलेल्या खोलीचा दरवाजा उघडला व आत प्रवेश केला चोरट्यांनी तेथे झोपलेल्या महिलांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सोने हिसकावून घेतले. आरडा-ओरड झाल्याने देविदास ढोके हे जागे झाले असता त्यांच्या खोलीचे दार बाहेरुन बंद होते. दरवाजा वाजवला असता तिन चोरट्यांनी दरवाजा उघडला व त्यांच्या पोटावर चाकू लावत खोलीतील कपाट तोडले व कपाटातील दागिने व रोख ९० हजार रुपये असा सहा लाख ३५ हजारांचा ऐवज लंपास केला व नंतर सर्व खोल्यांचे दरवाजे बाहेरून बंद केले.

दरम्यान, या घटनेमुळे आष्टीत भितीचे वातावरण निर्माण झाले असून येथील व्यापाऱ्याने एकत्र येऊन आष्टी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले व सहायक पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांना निवेदन दिले. जिल्हा परिषद सदस्य राहुल लोणीकर व बळीराम कडपे यांनी आष्टी पोलीस ठाण्यात व्यापाऱ्यांची भेट घेऊन वरिष्ठ स्तरावर चोरीचा तपास केला असे अश्वासन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या वतीने दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. या वेळी व्यापारी महासंघाचे राजेंद्र बाहेती, नारायण पळसे, कृष्णा टेकाळे, सुमंतराव पाटील, गोविंद दहिभाते, श्रीनिवास ढोके, अशोक शेळके, पं. स. सदस्य रामप्रसाद थोरात, वटाणे, बाबाराव थोरात, विष्णू शहाणे, आदींची उपस्थिती होती.

या प्रकरणी श्रीराम देविदास ढोके यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, उपविभागीय अधिकारी सी. डी. शेवगन, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गौर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, जमादार सोपान चव्हाण, सुकरे, चरावंडे, गव्हाने, तिबुले आदींनी भेटी दिल्या. तसेच श्वान पथकासह अंगुलीनिर्देश पथक ही दाखल झाले होते. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार हे करीत आहेत.