रेल्वेच्या सर्व सुविधांसाठी एकच हेल्पलाईन ‘139’; सुसुत्रता आणण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

506

रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना येणाऱ्या सर्व प्रकारच्या अडचणी आणि सेवेसाठी प्रशासनाने एकच एकीकृत हेल्पलाईन नंबर सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यापुर्वी रेल्वेच्या विविध तक्रारींसाठी सुमारे सहा वेगवेगळे नंबर होते. हे सर्व नंबर 1 जानेवारीपासून बंद करण्यात येणार असून यापुढे सर्व प्रकारच्या सेवेसाठी ‘139’ हा एकच नंबर सुरु राहणार आहे. तर, सुरक्षेसंबंधी माहितीसाठी रेल्वे पोलिसांचा (आरपीएफ) 182 हा नंबर कायम ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना आवश्यक असणारी मदत आणि येणाऱ्या अडचणी आता ‘139’ या एकाच क्रमांकाद्वारे प्रशासनापर्यंत पोहोचवता येणार आहेत. रेल्वे प्रवास करताना अनेक समस्या येतात. तर, अनेकदा प्रशासनाच्या मदतीची आवश्यकता भासते. सद्यस्थितीत प्रवासादरम्यान खानपानाबाबत सेवेसाठी 1800 11321 अपघाताबाबात माहितीसाठी 1072, सर्वसाधारण तक्रारींसाठी 138 आणि स्वच्छता विविध सेवा आणि मदत यासाठी एकूण सहा वेगवेगळे हेल्पलाईन नंबर उपलब्ध आहेत. यामाध्यमातून प्रवाशांना थेट प्रशासनाशी संपर्क साधता येतो. मात्र, रेल्वेचे वेगवेगळे हेल्पलाइन क्रमांक असल्याने प्रवाशांचा अनेकदा गोंधळ होतो. यामुळे प्रवाशांना सर्व प्रकारच्या सेवेसाठी एकच एकीकृत हेल्पलाईन क्रमांक सुरु ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यानूसार 1 जानेवारीपासून ‘139’ हा एकच नंबर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. याशिवाय रेल्वे प्रवाशांना तक्रारीसाठी ‘रेल मदद’ हे अॅप देखील उपलब्ध असून त्याव्दारे समस्या मांडता येणार आहेत.

सुरक्षे संदर्भात माहितीसाठी ‘182’
खानपान, स्वच्छता, गाड्यांचे वेळापत्रक आदींबाबत एकच नंबर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र, प्रवासात होणारी चोरी, महिला सुरक्षा, फसवणूक आदी रेल्वे सुरक्षा दलाशी संबंधित तक्रारी आणि मदतीसाठी प्रवाशांना ‘182’ या क्रमांकावर संपर्क करता येणार असून हा हेल्पलाईन नंबर सुरु ठेवण्यात आला आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

हे हेल्पलाईन क्रमांक होणार बंद

  • खानपान सेवा- 1800 11321
  • दुर्घटना -1072
  • एसएमएस तक्रारी – 97176 30982
  • सामान्य तक्रारी – 138
  • सतर्कता -152210
  • क्लीन माय कोच – 5888
आपली प्रतिक्रिया द्या