धक्कादायक…कमी ऐकू येणाऱ्या एका वर्षांच्या चिमुरड्याची हत्या करून आईची आत्महत्या

murder

एका सधन, संपन्न आणि सुसंस्कृत कुटुंबातील एका सरकारी कर्मचारी महिलेने नैराश्यात केलेल्या कृत्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. एका वर्षांच्या मुलाला कमी ऐकू येत असल्याने ही महिला नैराश्यात होती. त्यामुळे नैराश्याच्या भरात या महिलेने आपल्या एका वर्षाच्या चिमुरड्याची हत्या करून   आत्महत्या केली आहे. पश्चिम बंगालच्या आसनसोल शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे.

आसनसोलमधील राधानगरमध्ये बौसाखी माजी या 31 वर्षांच्या सरकारी कर्मचारी असलेल्या महिलेने आपल्या एका वर्षाच्या मुलाची हत्या केल्यानंतर आत्महत्या केली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी महिलेच्या कटुंबीयांचीही चौकशी केली आहे. आपल्या एका वर्षाच्या मुलाला कमी ऐकू येत असल्याने बौसाखी नैराश्यात असल्याचे त्यांच्या कटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. त्या नेहमी मुलाच्या चिंतेत होत्या. मुलाचे पुढे कसे होणार ही चिंता त्यांना सतावत होती. बौसाखी या सरकारी कर्मचारी असून त्यांचे पती बँकेत अधिकारी आहेत. संपन्न, सुसंस्कृत कुटुंबातील असूनही बौसाखी यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या