मुंबईकरांची वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली; धरणे पुन्हा ओव्हरफ्लो, पाणीसाठा 95.27 टक्के

दोन दिवसांपासून मुंबईत व धरणक्षेत्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला असून मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे पुन्हा ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यामुळे मुंबईकरांची वर्षभरासाठीच्या पाण्याची चिंता मिटली आहे. सात धरणांपैकी चार धरणे आज भरून वाहू लागली. या धरणांमधून मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सातही जलाशयांमधील पाणीसाठा 95.27 टक्क्यांवर पोहोचला आहे.

मध्य वैतरणा धरणाचे पाचही दरवाजे उघडले

गेल्या दोन दिवसांपासून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असून मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोखाडय़ातील मध्य वैतरणा धरण तुडुंब भरले आहे. त्यामुळे धरणाचे स्वयंचलित पाचही दरवाजे उघडले असून 11 हजार 124 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. धरणाच्या पाण्याची पातळी 284.35 मीटरला पोहोचली असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.