दिवाळीत भाव कडाडणार, पारनेरमध्ये कांदा आठ हजार रुपयांवर

onion-market

पारनेर बाजार समितीमध्ये रविवारी झालेल्या लिलावात कांद्याला 8 हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याची माहिती सभापती प्रशांत गायकवाड व उपसभापती विलास झावरे यांनी दिली आहे. सरासरी प्रथम प्रतीच्या कांद्याला 6500 ते 7500 रुपये दर मिळाला आहे. या हंगामातील हा पारनेर बाजार समितीत उच्चांकी दर आह़े  यामुळे शेतकऱयांनी समाधान व्यक्त केले आहे.

पारनेर बाजार समितीत रविवारी 9 हजार 735 गोण्यांची आवक झाली होती. प्रथम प्रतीच्या कांद्याला 6500 ते 7500, द्वितीय प्रतीच्या कांद्याला 5500 ते 6400, तिसऱया प्रतीच्या कांद्याला 4000 ते 5400, चौथ्या 2500 ते 3900 व पाचव्या 1000 ते 2400 असा क्विंटलला बाजारभाव मिळाला.

सध्या निर्यात बंद असली तरी देशांतर्गत बाजारात कांद्याचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे कांद्याचे दर वाढले आहेत. दक्षिणेकडील राज्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पावसामुळे कांद्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे देशांतर्गत कांद्याला मागणी वाढल्याने बाजारभावामध्ये वाढ होताना दिसत आहे.

महाराष्ट्रात नाशिक परिसरामध्ये जास्त प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र, यावर्षी तेथील कांदाही पावसामुळे खराब झाला आहे. राज्यातील इतर भागांतील कांद्याचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये कांद्याचे दर अजून वाढण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या