धक्कादायक! ऑनलाईन शिक्षण घेऊ शकत नसल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. ऑनलाईन शिक्षण घेता येत नसल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. शिबानी कुमारी (वय-16 वर्षे) असे या मुलीचे नाव आहे. ही दुर्दैवी घटना हावडा शहरात घडली आहे. शहरातील निश्चिंदा राजचंद्रपूर भागात ती राहात होती. शिबानीच्या खोलीत आत्महत्या करण्यापूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहिलेली सापडलेली नाही.

शिबानीचे वडील संतू साहू हे ट्रकचालक आहेत. त्यांनी सांगितले की शिबानी ही त्यांची धाकटी मुलगी होती आणि ती इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होती. लॉकडाऊन घोषित होण्यापूर्वी साहू , त्यांची पत्नी आणि मोठा मुलगा असे तिघेजण बिहारमधील समस्तीपूर इथे गेले होते. शिबानी आणि साहूंचा दुसरा मुलगा शिवोम हे हावड्यातच राहिले होते. या दोघांजवळ एकच स्मार्टफोन होता. शिवोमच्या हातून तो पडल्याने नादुरुस्त झाला होता. लॉकडाऊन काळात तो दुरुस्त करणं शक्य नव्हतं.

शिबानीची ऑनलाईन शाला 10 दिवसांपूर्वी सुरु झाली होती. ‘आपण 10 दिवसांत एकदाही ऑनलाईन क्लासला हजेरी लावली नाही, आपल्याला काही कळालं नाही तर आपण नापास होऊ’ अशी तिला सतत भीती वाटत होती. शिबानीने तिला वाटणारी भीती ही तिच्या वडिलांना दुसऱ्या फोनवरून कळवली होती. हा फोन बटणांचा मोबाईल होता, तो स्मार्टफोन नव्हता. संतू साहू यांनी फोनवरून तिची समजूत घातली होती की मी परत येताना दुसरा स्मारटफोन आणेन तू चिंता करू नकोस.

गुरुवारी शिवोम क्रिकेटच्या सरावासाठी बाहेर गेला होता. घरी आल्यानंतर दार उगडत नसल्याने त्याला काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. त्याने खिडकीतून डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला असता त्याला शिबानीने गळफास लावून आत्महत्या केल्याचं दिसून आलं.