ऑनलाइन गाडी खरेदीच्या नावाने फसवणूक

552

एका वेबसाइटवरून सेकंड हॅण्ड गाडी खरेदी करणे एकाला चांगलेच महागात पडले. गाडी खरेदीच्या नावाखाली सायबर भामट्याने त्यांना ऑनलाइन चुना लावला. फसवणूकप्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

तक्रारदार हे बोरिवलीत राहतात. त्यांना सेकंड हॅण्ड गाडी खरेदी करायची होती. गेल्या महिन्यात गाडी खरेदीकरिता त्यांनी एक वेबसाइट सर्च केली. तेथे त्यांनी एका गाडीची जाहिरात पाहिली. जाहिरातीखाली असलेल्या नंबरवर तक्रारदारानी फोन केला तेव्हा भामट्याने सुरुवातीला त्यांचा फोन कट केला. त्यानंतर दोन दिवसांनी भामट्याने तक्रारदारांना फोन केला. आपण हिंदुस्थानी लष्करात असल्याने व्यस्त असल्याच्या भूलथापा मारल्या. गाडी खरेदी करायची असल्यास एक लाख रुपये टोकन म्हणून द्यावे लागतील असे त्यांना सांगितले. विश्वास बसावा म्हणून भामट्याने तक्रारदारांच्या व्हॉटस्ऍपवर लष्कराचे ओळखपत्र पाठवले.

ओळखपत्र पाहिल्यावर तक्रारदारांनी एका बँक खात्यात एक लाख रुपये जमा केले. भामट्याने तक्रारदाराना पैसे मिळाल्याची रिसीट पाठवली. पैसे मिळाले असून एकजण गाडी सोडायला येत आहे. त्याचे ओळखपत्र पाठवल्याच्या भूलथापा भामट्याने मारल्या. गाडी सोडण्याकरिता 38 हजार रुपये भरावे लागतील असे तक्रारदारांना सांगण्यात आले तेव्हा तक्रारदाराकडे पैसे नव्हते. त्यांनी नातेवाईकांकडून पैसे घेऊन पैसे बँक खात्यात जमा केले. पैसे भरल्यावर भामट्याने आणखी पैशांची मागणी केली. हा प्रकार तक्रारदारांना संशयास्पद वाटला. त्यांनी बोरिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

आर्थिक ऑनलाइन व्यवहार टाळा 

ऑनलाइन गाडी किंवा मोटारसायकल खरेदी करताना नेटिझन्सने खबरदारी घ्यावी. विक्री करणारी व्यक्ती समोर येत नाही तोपर्यंत आर्थिक व्यवहार टाळावेत. आपण लष्करात असून मोटारसायकल आणि वाहन विकण्याच्या नावाखाली जाहिरात ऑनलाइन पोर्टलवर टाकतात. गाडीची किंमत कमी असल्याने नेटिझन्स हे भामट्याच्या जाळ्यात सहज अडकतात.

आपली प्रतिक्रिया द्या