
ऑनलाईन जुगाराच्या नादी लागून एका उमद्या तरुणाने आपल्या संसाराचे वाटोळे केले. ऑनलाईन जुगारामुळे डोक्यावर कर्जाचे ओझे झाल्याने पत्नी, दोन वर्षांच्या चिमुकल्यास विष देऊन या तरुणाने स्वतःही आत्महत्या केली. धाराशिव जिल्हय़ातील बावी येथे ही घटना घडली.
धाराशिव तालुक्यातील बावी येथील लक्ष्मण मारुती जाधव (29) याला जुगाराचा भयंकर नाद होता. तो ऑनलाईन रमीही खेळायचा. ऑनलाईन जुगाराच्या वेडाने त्याच्या डोक्यावर मोठे कर्ज झाले होते. कर्जाच्या वसुलीसाठी त्याच्यामागे तगादाही लागला होता. कर्ज फेडण्यासाठी लक्ष्मणने एक एकर जमीन तसेच प्लॉटही विकला. परंतु कर्ज काही उतरले नाही. उरलेले कर्ज कसे फेडायचे याच विवंचनेतून आज लक्ष्मणने पत्नी तेजस्विनी आणि दोन वर्षांच्या मुलाला विष दिले आणि स्वतः गळफास घेतला. सकाळी बराच वेळ घराचा दरवाजा उघडला नसल्याने गावकऱयांना संशय आला. गावकऱयांनी पोलिसांना बोलावले. दरवाजा उघडला असता हा प्रकार समोर आला.
लक्ष्मण जाधव हा ट्रक्टर चालक म्हणून काम करत होता. गावातीलच तेजस्विनी हिच्याशी तीन वर्षांपूर्वी त्याचा प्रेमविवाह झाला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.