श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 25 मार्चपासून ऑनलाईन नोंदणी; कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपुजा, पाद्यपूजा व तुळशी अर्चन पूजा इत्यादी सर्व प्रकारच्या पूजा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. 01 एप्रिल ते 31 जुलै, 2026 या कालावधीतील पुजांची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्याची सुरवात 25 मार्च रोजी सकाळी11.00 पासून होत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

याबाबत मंदिर समितीच्या 03 मार्च 2024 रोजीच्या सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत निर्णय घेण्यात आला होता. यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. भाविकांना पूजेची नोंदणी https://www.vitthalrukminimandir.org या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे.

7 ऑक्टोबर, 2024 पासून श्रींच्या नित्यपूजा, तुळशी अर्चन पूजा व पाद्यपूजा टप्प्याटप्प्याने ऑनलाइन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून व देशभरातून कर्नाटक, आसाम, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातील भाविकांनी पूजेची नोंदणी केली होती. यास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आता, पुढील टप्प्यात 01 एप्रिल ते 31 जुलै, 2026 या कालावधीतील सण, उत्सव व गर्दीचे दिवस वगळून इतर दिवशीच्या श्रींच्या नित्यपूजा, पाद्यपूजा व महानैवेद्य सहभाग योजना तसेच माहे एप्रिल, 2026 मधील तुळशी अर्चन पूजा ऑनलाइन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ऑनलाइन नोंदणीसाठी काही अडचणी आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयातून नोंदणी करून देण्यास मदत व आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येईल. याबाबतची अधिक माहिती, अटी व शर्ती मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी मंदिर समितीच्या 02186 -299299 या दूरध्वनी क्रमांकावर भाविकांनी संपर्क साधावा अशी माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेच्या नित्यपूजेसाठी अनुक्रमे रु.25,000/-, रू.11,000/- तसेच पाद्यपूजेसाठी रू.5,000/- व तुळशी अर्चन पूजेसाठी रू.2100/- तसेच महानैवेद्य सहभाग योजनेसाठी रू.7,000/- इतके देणगी मुल्य आहे.