सरासरीच्या केवळ 130 मिलिमीटर पाऊस; पेरलेल्या खरीप पीकांना जीवदान

33

सामना प्रतिनिधी । परभणी

परभणीत आज पहाटेपासून पुन्हा एकदा रिमझिम पावसाला सुरुवात झाली असून सकाळी 10 नंतर पावसाचा जोर वाढला. परंतु सकाळी 11 नंतर मात्र पुन्हा पावसाला खंड पडला. मौसमाच्या सुरुवातीलाच लांबलेला पाऊस आणि त्यानंतर पावसात पडलेला मोठा खंड या पाश्र्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील नदी नाले आणि प्रकल्पांमधील पाणीसाठा वाढण्यासाठी दमदार पावसाची नितांत गरज आहे.

आज झालेल्या पावसामुळे समाधान व्यक्त होत असले तरी परभणीत आतापर्यंत सरासरीच्या केवळ १३० मिलिमीटर पाऊस झाला आहे. अधिकृत सूत्रानुसार गेल्या चोवीस तासात 5.43 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 1 जूनपासून आजपर्यंत अपेक्षित पावसाच्या केवळ 49.7 टक्केच पाऊस झाला. यामुळे परभणी जिल्ह्यात निम्म्या पावसाची तूट असून याचा परिणाम पिकांवर झालेला आहे. बाल्यअवस्थेत असलेल्यापीकांना पाण्याची नितांत गरज आहे. परंतु अजुनही दमदार पाऊस पडला नाही. त्यामुळे पाणी साठयात वाढ झाली नाही. परिणामी जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे.

मृग नक्षत्र संपल्यानंतर मागच्या दिड महिन्यात एकही दमदार पाऊस पडला नाही, परिणामी, कोठेही पाण्याचा साठा दिसून येत नाही. पडलेला पाऊस जमिनीत मुरला पण त्यानंतर वाढलेल्या उष्णतेमुळे जमिनी कोरड्या पडायला लागल्या होत्या. मात्र, काल सायंकाळनंतर पुन्हा एकदा परभणी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या चोवीस तासात पालम व सोनपेठ याठिकाणी 10 ते 16 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर उर्वरित जिल्ह्यात केवळ 1 मिलिमीटर पाऊस झाला आहे. सध्या परभणीत सर्वदूर पाऊस पडत असून, याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सुरुवातीला पेरणी झालेल्या पिकांना तग धरण्यासाठी याचा फायदा होईल तर, उशीराने पेरणी झालेल्या पिकांच्या पोषणासाठी हा पाऊस लाभदायक असणार आहे. पण तरीही नदी-नाले, ओढे भरण्यासाठी दमदार पावसाची आवश्यकता असून त्याची सर्वानाच प्रतिक्षा आहे.

हा पाऊस पिकांना जीवदान देण्यासाठी पुरेसा नसल्याने शेतकऱ्यांना अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. मागील 15 130दिवसांपासून या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सोयाबीन, कापूस, मूग व उडीद या पिकांची पेरणी केली. मात्र पाऊस गायब झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. पूर्णा तालुक्यातल कावलगाव, धानोरा मोत्या, चुडावा, पिंपळा भत्या, लिंबगाव या परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सायंकाळी 4 ते 5 वाजण्याच्या दरम्यान झालेला पाऊस उगवण झालेल्या पिकांसाठी लाभदायक ठरणारा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या