पुण्यात दोन लाख मीटरच्या रीडिंगसाठी केवळ 24 कर्मचारी; समान पाणीपुरवठा योजनेचा बट्ट्याबोळ

पुणे शहरात समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत सुमारे 1 लाख 80 हजार मीटर बसविले आहेत. मात्र, मीटरचे रीडिंग घेण्यासाठी महापालिकेकडे केवळ 24 मीटर रीडर आहेत. व्यावसायिक वापराच्या ठिकाणी मीटरद्वारे पाणीपट्टी आकारणी सुरू झाल्यानंतर वाढीव बिलाच्या तक्रारींतही वाढ झाली आहे. त्यामुळे मीटर रीडरचा अभाव असल्याने अचानक सहा ते वर्षभराची लाखो रुपयांची बिले पाहून नागरिक, व्यावसायिकांना धक्के बसत आहेत.

समान पाणीपुरवठा योजनेचा बट्ट्याबोळ
शहराच्या सर्व भागांत समान पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेने समान पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेतले. वितरण यंत्रणेतील गळती कमी करणे, जुन्या वाहिन्यांच्या जागी नवीन वाहिन्या टाकणे, पाण्याचे मीटर बसविणे आदी कामे या योजनेत केली जात आहेत. सध्या योजनेंतर्गत व्यावसायिक आणि निवासी ठिकाणी सुमारे १ लाख ८० हजार पाण्याचे मीटर बसविले गेले आहेत.

पूर्वी व्यावसायिक वापरासाठी मीटरद्वारे पाणीपट्टी आकारली जात होती. याकरिता मेकॅनिकल मीटर वापरले जात होते, त्याच्या जागी आता अॅटोमॅटीक रीडिंग मीटर बसविले जात आहेत. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सध्या व्यावसायिक वापराच्या ठिकाणी मीटरद्वारे पाणीपट्टी आकारली जात आहे. नवीन मीटरमुळे पाण्याचा अचूक वापर नोंदविला जात आहे.

सध्या पाणीपट्टी वाढल्याच्या तक्रारींत वाढ होऊ लागल्या आहेत. व्यावसायिक मिळकती असलेल्या निवासी गृहसोसायट्यांमध्ये हे प्रकार आढळून येत आहेत. मीटर नादुरुस्ती असल्याच्या तक्रारी आल्यानंतर पाणीपुरवठा विभागाकडून पाहणी करून पुढील कार्यवाही केली जात असल्याची माहिती महापालिकेचे अधीक्षक अभियंता प्रसन्नराघव जोशी यांनी दिली.

59 पदे रिक्त
शहरात सुमारे १ लाख ८० हजार मीटर बसविले गेले असून, त्याचे रीडिंग घेण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे केवळ २४ मीटर रिडर आहेत. अनेक वर्षांपासून या पदाची भरती झाली नाही. दरवर्षी या पदावरील कर्मचारी निवृत्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. रिक्त पदे भरली गेली नाहीत. मीटर रीडर या पदाची सुमारे ८३ पदे मंजूर आहेत. उर्वरित ५९ पदे रिक्त आहेत. मीटरची संख्या पाहता मंजूर पदेही कमी असून, भविष्यात त्यांची संख्या वाढवावी लागणार आहे. त्याचप्रमाणे मिस्त्री आणि मुकादम या पदांची सुमारे ५० ते ५५ पदे रिक्त आहेत.