वाडा तालुक्यातील 14 गावपाड्यांना फक्त टँकरचा आधार; महिलांची झुंबड

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वाडा तालुक्यात सध्या उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील १४ गावपाड्यांवर फक्त टँकरचा आधार असून पाण्यासाठी महिलांची झुंबड होते. सरकारने विविध ठिकाणी लाखो रुपये खर्च करून टाक्या उभारल्या. नळाचे कनेक्शनदेखील दिले. पण प्रत्यक्षात पाण्याचा टिपूसही येत नसल्याने भीषण पाणीटंचाईशी सामना करण्याची – वेळ आली आहे. राज्य व केंद्र सरकारच्या योजना गेल्या कुठे, असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे.

वाडा तालुक्यातील सागमाळ, टोकरेपाडा, जांभूळपाडा, घोडसाखरे, दिवेपाडा, फणसपाडा, गवळीपाडा, तरसेपाडा, डोंगरीपाडा, फणसपाडा, पिंपळास, मुसारणे, चौरेपाडा तर नदीचापाडा या गावपाड्यांत सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. येथील नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. वाडा तालुक्यातील अनेक गाव-पाड्यांमध्ये जलजीवन मिशन योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर आहे. पण या योजनांचा कालावधी संपला तरी योजना पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत.

काही योजनांची कामे झाली. मात्र ती निकृष्ट दर्जाची झाली असून अनेक ठिकाणची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. पाणीपुरवठा योजनेसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. पण टंचाई काही दूर झालेली नाही.

ओगदा ग्रामपंचायत हद्दीतील पाड्यात जलजीवन मिशन योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर असून, वन विभागाकडे हा प्रस्ताव प्रलंबित आहे, त्यामुळे या योजना पूर्ण होऊ शकल्या नाहीत.

योजना अपूर्ण असलेल्या गाव-पाड्यांत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती वाडा पंचायत समितीचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता जे. डी. जाधव यांनी दिली.

प्रशासनाचा ढिसाळ कारभार
जलजीवन मिशन योजनेंतर्गत वाडा तालुक्यात करोडो रुपयांचा निधी खर्च केला आहे. मात्र प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे येथील महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याची खंत ग्रामस्थ सागर पाटील यांनी व्यक्त केली. वाड्यातील १४ गावांमध्ये पाण्याचे टँकर येताच मोठ्या प्रमाणावर झुंबड उडते. लवकरात लवकर रखडलेल्या पाणी योजना पूर्ण कराव्यात, अशी मागणी वाडावासीयांनी केली आहे.