Operation Sindoor 18 विमानतळ बंद; 200 फ्लाईट्स रद्द

पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केल्यानंतर आलेल्या हवाई क्षेत्रावरील निर्बंधांमुळे बुधवारी हिंदुस्थानातील 200 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. तसेच, श्रीनगरसह किमान 18 विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आल्याने 10 मेपर्यंत अनेक कंपन्यांनी या ठिकाणची उड्डाणे रद्द केली आहेत.

बुधवारी विविध विमानतळांवरील 200 हून अधिक उड्डाणे विमान कंपन्यांनी रद्द केली. देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागातील किमान 18 विमानतळे तात्पुरते बंद करण्यात आली आहेत. यात श्रीनगर, लेह, जम्मू, अमृतसर, पठाणकोट, चंदीगड, जोधपूर, जैसलमेर, शिमला, धर्मशाळा आणि जामनगर यांचा समावेश आहे.

इंडिगोने 10 मे रोजी पहाटेपर्यंत अमृतसर आणि श्रीनगरसह विविध देशांतर्गत विमानतळांवरून 165 हून अधिक उड्डाणे रद्द केली आहेत. तर जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड आणि राजकोट या विमानतळांवरील एअर इंडियाची उड्डाणे 10 मे रोजी सकाळी 05.29 वाजेपर्यंत रद्द करण्यात आली आहेत. स्पाइसजेटचीही धर्मशाळा, लेह, जम्मू, श्रीनगर आणि अमृतसरसह उत्तर भारतातील काही भागांमधील उड्डाणे पुढील सूचना येईपर्यंत बंद राहणार आहेत. अकासा एअरने श्रीनगरला जाणारी आणि येणारी सर्व उड्डाणे रद्द केली. स्टार एअरने नांदेड, हिंडन, आदमपूर, किशनगड आणि भूजची उड्डाणे रद्द केली.

दिल्लीतील 35 उड्डाणे रद्द

दिल्ली विमानतळावर रात्री 12 वाजल्यापासूनची किमान 35 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यात राष्ट्रीय 31 आणि आंतरराष्ट्रीय चार उड्डाणांचा समावेश आहे. अमेरिकन एअरलाइन्ससह परदेशी कंपन्यांनीही दिल्ली विमानतळावरून त्यांच्या काही सेवा रद्द केल्या. कतार एअरवेजने पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे ती उड्डाणे तात्पुरती स्थगित केली आहेत.