सर्वपक्षीय बैठकीतून हिंदुस्थानने पाकड्यांना दिला एकजुटीचा संदेश, सरकारने दिली ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती

पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर 26 निष्पाप नागरिकांचा जीव घेणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना हिंदुस्थानने मंगळवारी ‘ऑपरेशन सिंदूर’ने प्रत्युत्तर दिले. हिंदुस्थानी लष्कराने पाकिस्तानात हवाई हल्ला करत बदला घेतला. पीओके आणि पाकिस्तानात 100 किलोमीटर आत लक्ष्यभेद करत लश्कर-ए-तोयबा, हिजबुल मुजाहिदीन आणि जैश-ए-मोहम्मदचे 9 अड्डे उखडून टाकण्यात आले. ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी झाल्यानंतर गुरुवारी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीत सरकारने सर्वपक्षीय सदस्यांना ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली आणि पाकड्यांना एकजुटीचा संदेशही दिला.

दिल्लीत गुरुवारी सकाळी 11 वाजता सुरू झालेली सर्वपक्षीय बैठक दीड तास चालली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी. नड्डा, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, टीएमसी नेते सुदीप बंद्योपाध्याय, डीएमकेचे नेते टीआर बालू, टीडीपीचे नेते कृष्णा, जेडीयू नेते संजय झाल, एलजेपीचे नेते चिराग पासवान, सपाकडून रामगोपाल यादव, आपचे नेते संजय सिंह, एमआयएमचे नेते असदुद्दीने ओवैसी यांच्यासह इतर पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते.

सर्वपक्षीय बैठकीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना ‘ऑपरेशन सिंदूर’ बाबत आणि हिंदुस्थानी लष्कराने गाजवलेल्या शौर्याबाबत माहिती दिली. तसेच हिंदुस्थानच्या तयारीचीही माहिती देण्यात आली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित नव्हते, मात्र त्यांनी आपला संदेश इथे पोहोचवला. अशा संकटाच्या परिस्थितीत विरोधी पक्षांनी आणि नागरिकांनीही एकजूट व्हावे अशी मागणी मोदींनी केली. याला विरोधी पक्षांनीही साथ देत सर्वांनीच सरकारला पाठिंबा दर्शवला.