
हिंदुस्थानी हवाई दलाने बुधवारी पहाटे पाकिस्तानात घुसून तेथील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. हा एअर स्ट्राईक करत हिंदुस्थानने 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. संपूर्ण देशभरात हिंदुस्थानी जवानांनी केलेल्या या कारवाईचे कौतुक होत आहे. दरम्यान हिंदुस्थानचे माजी लष्कर प्रमुख मनोज नरावणे यांनी एक पोस्ट शेअर करत या हल्ल्यापेक्षाही काहीतरी मोठे घडणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या या पोस्टवरून आता नेमके या घडणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
Abhi picture baki hai…
— Manoj Naravane (@ManojNaravane) May 7, 2025
ऑपरेशन सिंदूरनंतर बुधवारी सकाळी मनोज नरावणे यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली. त्या पोस्टमध्ये त्यांनी फक्त ‘अभी पिच्चर बाकी है’ इतकेच लिहले आहे. मात्र या चार शब्दांतून त्यांनी काहीतरी मोठे होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
ऑपरेशन सिंदूर
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा हिंदुस्थानी सैन्याने बदला घेतला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू करून हिंदुस्थानी हवाई दलाने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या 9 तळांवर हवाई हल्ले केले. रात्री 1.30 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. हे हल्ले बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद येथे करण्यात आले आहेत. संरक्षण मंत्रालयाने याबाबत X वर पोस्ट करत माहिती दिली आहे.