
पहलगाममध्ये 26 निष्पाप पर्यटकांचा बळी घेऊन माता-भगिनींचे कुंकू पुसणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’चा तडाखा दिला. मंगळवारची रात्र अतिरेक्यांसाठी कर्दनकाळ ठरली. लष्कराने पाकिस्तानात हवाई हल्ला करत बदला घेतला. पीओके आणि पाकिस्तानात 100 किलोमीटर आत लक्ष्यभेद करत लश्कर-ए-तोयबा, हिजबुल मुजाहिदीन आणि जैश-ए-मोहम्मदचे 9 अड्डे उखडून टाकण्यात आले. आंतरराष्ट्रीय सीमा न ओलांडता अवघ्या 25 मिनिटांमध्ये 24 क्षेपणास्त्रs डागत 100हून अधिक दहशतवाद्यांचा हिंदुस्थानच्या योद्धय़ांनी खात्मा केला. या हल्ल्यानंतर अवघ्या देशाने ‘हिंदुस्थान झिंदाबाद’चा जयघोष केला आणि लष्कराला सॅल्यूट ठोकला.
हिंदुस्थानच्या संरक्षण ताकदीचे दर्शन अवघ्या जगाला घडले आहे. पाकिस्तानविरोधात केलेल्या लष्करी कारवाईचे सर्व पक्षांनी स्वागत केले असून, देशभरात सर्वत्र समाधानाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.
22 एप्रिल रोजी पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळीबार केला होता. हिंदूंना टार्गेट करीत ठार केले. याचा तीव्र संताप देशभरात उमटले. पाकिस्तानला धडा शिकवा, बदला घ्या, दहशतवाद्यांना चुन चुन के मारो अशी मागणी होत होती. अखेर 15 दिवसानंतर हिंदुस्थानी लष्कर, हवाई दलाने पाकिस्तानचा बदला घेतला. पाकडय़ांना चांगलाच धडा शिकवला. या हल्ल्यानंतर पाकिस्तानात खळबळ उडाली असून अनेक ठिकाणी आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
असे झाले ‘ऑपरेशन सिंदूर’
– पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे, अशी माहिती लष्कराने सर्वप्रथम ‘एक्स’वर मंगळवारी मध्यरात्री 1.44ला दिली. त्यानंतर केंद्र सरकारने प्रेस रिलीज जारी केली.
– ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेत 100 वर दहशतवादी मारले गेले.
– बुधवारी सकाळी 10.30 वाजता परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पत्रकार परिषदेत ‘ऑपरेशन सिंदूर’चा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच संरक्षण दलातील दोन महिला अधिकाऱ्यांनी अशी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ‘ऑपरेशन सिंदूर’ची चित्रफीत दाखविण्यात आली.
– मंगळवारी मध्यरात्री 1.05 वाजता ‘ऑपरेशन सिंदूर’ला सुरुवात झाली आणि 1.30 वाजता हे ऑपरेशन संपले. अत्याधुनिक राफेल विमानातून 24 क्षेपणास्त्र डागण्यात आली.
– ‘ऑपरेशन सिंदूर’चे टार्गेट फिक्स होते. लष्कर-ए- तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीनचे नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. 100वर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. अवघ्या 25 मिनिटांत हे ऑपरेशन फत्ते करण्यात
आले.
– पाकिस्तानचे कोणतेही सैन्य तळ किंवा नागरी वस्तीला टार्गेट करण्यात आलेले नाही.
निमलष्करी दलाच्या सुट्टय़ा रद्द; सीमावर्ती भागात हायअलर्ट
– ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने सीमावर्ती भागात हाय अलर्ट जारी केला आहे. तसेच निमलष्करी दलाच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत. सैनिकांना रात्रभर सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सीमावर्ती भागात होणाऱया हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
पाकिस्तानी शेअर बाजार कोसळला
– पाकिस्तानचा शेअर बाजार 6500 अंकांनी कोसळला. शेअर बाजाराचा निर्देशांक 6560.50 अंकांच्या घसरणीसह 107,007.68 वर बंद झाला. आज पाकिस्तानचा शेअर बाजार 6560 अंकांच्या घसरणीसह उघडला होता. परंतु, त्यात सुधारणा होत तो 3521.50 किंवा 3.10 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला.
अजित डोभाल यांची अनेक देशांशी चर्चा
– राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी अनेक देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली. त्यांना पाकिस्तान आणि पीओकेतील दहशतवाद्यांच्या तळांवर करण्यात आलेल्या हल्ल्याची माहिती दिली. अमेरिका सौदी अरेबिया, जपान, रशिया, चीन, फ्रान्स यांच्याशी डोभाल यांनी संपर्क साधला.
– ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती लष्करातील दोन धडाडीच्या महिला अधिकाऱ्यांनी दिली. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांच्यासह पत्रकार परिषद घेतली. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सशस्त्र दलातील दोन महिला अधिकाऱयांनी अशी पत्रकार परिषद घेतली.
अचूक लक्ष्यभेद
गुप्तचर यंत्रणांच्या इनपुट्सच्या आधारे दहशतवाद्यांचे लाँचपॅड आणि प्रशिक्षण केंद्रांवर अचूक मारा करण्यात आला. पाकव्याप्त कश्मीरमधील 5 आणि पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे चार अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. पाकिस्तानचा कोणताही सैन्यतळ किंवा नागरी वस्तीला टार्गेट करण्यात आलेले नाही, असे कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले.
आगळीक करू नका
केवळ दहशतवादी तळांनाच लक्ष्य करण्याच्या उद्देशाने एअरस्ट्राइक करण्यात आला. त्यानंतरही पाकिस्तानने कुठल्याही प्रकारची आगळीक केल्यास हिंदुस्थान उत्तर देण्यासाठी सज्ज आहे, असे विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी ठणकावले. एअरस्ट्राइकसाठी अत्याधुनिक आणि अचूक लक्ष्यभेद करणाऱया तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.
टार्गेट
मुझफ्फराबाद
सय्यदना बिलाल कॅम्प
शवाई नाला कॅम्प
कोटली
मरकज अब्बास
मस्कर राहील शाहिद
बरनाला
सियालकोट
तेहरा कलान
मुरीदके
बहावलपूर
आज सर्वपक्षीय बैठक
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर केंद्र सरकारने उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीबाबत संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी माहिती दिली. संसद भवनातील पुस्तकालय भवनात सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या बैठकीला उपस्थित राहणार असून सर्व पक्षांशी चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत शिवसेनेच्या वतीने उपस्थित राहणार आहेत.
हे तर होणारच होते, हा गर्वाचा क्षण
देशासाठी हा अत्यंत गौरवाचा क्षण असून हे तर होणारच होते, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. संपूर्ण देशाचे लक्ष याकडे होते. जराही चूक न करता अचूक लक्ष्यभेद करत ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम फत्ते केली गेली, असे मोदी म्हणाले. नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज पेंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. बैठकीत मोदींनी सर्व मंत्र्यांना ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल माहिती दिली.