
जम्मू-कश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा बदला हिंदुस्थानने घेतला. मंगळवारी मध्यरात्री हिंदुस्थानने पीओके आणि पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी तळ उध्वस्त केले. यामुळे सैरभैर झालेल्या पाकिस्तानने हिंदुस्थानच्या अनेक शहरांवर ड्रोन आणि मिसाइल हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र हिंदुस्थानच्या एयर डिफेन्स सिस्टीमने हे हल्ले परतवून लावले. एवढेच नाही तर हिंदुस्थानने लाहोर मधील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीमही उडवली. यामुळे बिथरलेल्या गुरुवारी सायंकाळी हिंदुस्थानवर हल्ल्याचा प्रयत्न केला. हा हल्ला परतवून लावत हिंदुस्थानने थेट लाहोरपर्यंत मुसंडी मारली असून सियालकोट निशाण्यावर आहे. हिंदुस्थानी लष्कराने लाहोर आणि सियालकोटवर जोरदार प्रतिहल्ला केला आहे.
ऑपरेशन सिंदूरमुळे बिथरलेल्या पाकिस्तानने जम्मू, पठाणकोट, जैसलमेर, पंजाब मधील होशियारपूर येथे ड्रोन आणि मिसाइल हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र हिंदुस्थानच्या एअर डिफेन्स सिस्टीमने हल्ले परतवून लावले. एवढेच नाही तर पाकिस्तान वर काउंटर अटॅक सुरू केला असून पंजाब प्रांतातील एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम आणि लाहोर मधील सरगोधा डिफेन्स सिस्टीम उध्वस्त केली आहे. हिंदुस्थानच्या हल्ल्यानंतर लाहोरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आले असून लोकांची भीतीने गाळण उडाली आहे. दुसरीकडे हिंदुस्तानी सियालकोट मध्ये ही जोरदार हल्ले चढवले आहेत.