Operation Sindoor सोफियाचा सार्थ अभिमान! आई हलिमा कुरेशी यांनी केले कौतुक

माझ्या मुलीने जे काही केले, देशासाठी केले. त्यासाठी तिचा सार्थ अभिमान आहे, अशा शब्दांत कर्नल सोफिया कुरेशी यांच्या आई हलिमा कुरेशी यांनी सोफिया यांच्या कामगिरीबद्दल काwतुकोद्गार काढले.

माझ्या मुलीने देशासाठी जे काही केले त्याचा खूप आनंद आहे. इतरांनीही आपल्या मुलींना शिकवावे, समृद्ध करावे, त्यांना चांगले शिक्षण द्यावे, जेणेकरून त्या माझ्या मुलीप्रमाणे सैन्य दलात अधिकारी होतील आणि देशासाठी काही तरी करू शकतील. प्रत्येक घरातील एक मुलगी आणि एक मुलगा सैन्यात गेला पाहिजे असे मला वाटते, असे हलिमा कुरेशी म्हणाल्या. सोफिया जेव्हा लहान होती तेव्हा तिची आजी तिला गोष्टी सांगायची. तुझे आजोबा लष्करात आहेत असे सांगत तिला त्यांचे किस्सेही कथन करायची. तिचे शिक्षण झाल्यानंतर तिनेच मला लष्करात जायचे आहे असे सांगितले.

ती म्हणाली होती, आमच्यासाठी दुवा कर

एअर स्ट्राईकच्या आधी सोफिया म्हणाली होती, आमच्यासाठी दुवा कर, काय होणार आहे हे माहीत नाही, असेही हलिमा कुरेशी यांनी सांगितले, तर आज टीव्ही बघताना मला समजले की पाकिस्तानवर एअर स्ट्राईक झाला. तिने पाकिस्तानला कसा धडा शिकवला हे ऐकले आणि माझी छाती अभिमानाने फुलून गेली, अशी प्रतिक्रिया हलिमा यांच्या भावाने दिली.

लेफ्टनंट सोफिया कुरेशी या मूळच्या गुजरातच्या रहिवासी आहेत. त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतली आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी 1999 मध्ये चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीतून प्रशिक्षण घेतले. 44 वर्षीय असलेल्या कुरेशी यांनी कमी वयात अनेक महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडलेली आहे. देशाच्या लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व करणाऱया त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. आजच्या कारवाईनंतर सोफिया यांची जगभरात चर्चा सुरू आहे.