बॅटरीच्या प्रकाशातील शस्त्रक्रिया जिवावर बेतली, हायकोर्टात याचिका दाखल

महापालिकेच्या सुषमा स्वराज मॅटर्निटी रुग्णालयात बॅटरीच्या प्रकाशात शस्त्रक्रिया केल्यानंतर नवजात अर्भक व मातेचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी तसेच उपचाराची कागदपत्रे देण्यासाठी पोलिसांना आदेश द्या, अशी मागणी करीत महिलेच्या पतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने सोमवारी याचिकेची दखल घेतली आणि भांडुपच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

26 वर्षीय शहीदुनिसा अन्सारी या महिलेला एप्रिल महिन्यात पालिकेच्या सुषमा स्वराज मॅटर्निटी रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित झाल्याने बॅटरीच्या प्रकाशात तिच्यावर उपचार करण्यात आले. नंतर तिला लोकमान्य टिळक रुग्णालयात हलवले होते. याच दरम्यान तिचा व नवजात अर्भकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी शहीदुनिसाचा पती खुसरुद्दीन अन्सारीने उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. पत्नीच्या उपचाराचे संपूर्ण रेकॉर्ड देण्यासाठी रुग्णालय प्रशासन व पोलिसांना आदेश द्या, अशी विनंती याचिकेतून केली आहे. या प्रकरणी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. खंडपीठाने भांडुप पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर राहून भूमिका मांडण्याचे निर्देश दिले. 14 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे.