आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतला. राज्यातील काही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा कार्यकाळ ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात संपुष्टात येत असल्याने या निवडणुका घेण्याची योजना होती. मात्र विधानसभा निवडणुकीचे कारण देत या निवडीची प्रक्रिया आता पुढील तीन महिने लांबणार आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेली काही वर्षे न्यायालयीन कारणामुळे रखडल्या आहेत. त्यात सध्या अस्तित्वात असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या अध्यक्ष पदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या निवडी तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विधानसभेची निवडणूक नव्हेंबर महिन्यात अपेक्षित असल्याने हा निर्णय घेण्यात आला.
जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष तसेच विविध विषय समित्यांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा कार्यकाळ सध्या अडीच वर्षे एवढा आहे. त्यामुळे काही जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा कार्यकाळ ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात संपत आहे. मात्र विधानसभेच्या गडबडीत ही निवड होणे शक्य नसल्याने त्या पुढे ढकलण्याबाबत ग्रामविकास विभागाने याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर केला होता.