शाळांतील आरटीई प्रवेशाच्या पहिल्या सोडतीची प्रक्रिया आता पूर्ण झाली असून उद्या 16 ऑगस्टपासून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाणार आहे. 26 ऑगस्टपर्यंत प्रतीक्षा यादीतील प्रवेश पूर्ण करावेत अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सर्व शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालकांनी दिल्या आहेत. राज्यात आरटीई प्रवेशासाठी 9 हजार 217 शाळांमध्ये 1 लाख 5 हजार 242 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी राज्यातून 2 लाख 42 हजार 516 विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. त्यापैकी 93 हजार 9 विद्यार्थ्यांची लकी ड्रॉच्या माध्यमातून झाली निवड आहे. प्रवेशासाठी 93 हजार 9 विद्यार्थ्यांची निवड होऊन देखील आतापर्यंत 60 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश कन्फर्म झाले आहेत. अद्याप खासगी शाळांमध्ये आरटीई प्रवेशाच्या 45 हजाराहून जास्त जागा शिल्लक आहे, अशी माहिती गोसावी यांनी दिली. पालकांनी आरटीई प्रवेशाच्या वेबसाईटवर दिलेल्या सूचनांनुसार प्रतीक्षा यादीतील प्रवेशाची कार्यवाही पूर्ण करावी, असेही गोसावी म्हणाले.