
सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर मंदिरासमोरील दोन्ही रस्त्यांना गटारीच्या घाण पाण्याचा आणि अतिक्रमणाचा विळखा पडला असून, दोन दिवसांत अतिक्रमण काढण्यात यावे आणि पादचारी मार्गासह वाहतुकीला रस्ता मोकळा करून द्यावा; अन्यथा पालिकेच्या प्रवेशद्वारात ‘निद्रा आंदोलन’ करून प्रशासनाला बांगडय़ांचा आहेर देऊ, असा इशारा सकल लिंगायत महासमितीचे राज्य समन्वयक डॉ. बसवराज बगले यांच्यासह लिंगायत संघटनांच्या प्रमुखांनी दिला आहे.
सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल उगले आणि पोलीस आयुक्तांना महाराष्ट्र लिंगायत संघर्ष समितीचे समन्वयक डॉ. बसवराज बगले, शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सारणे यांनी निवेदन सादर केले.
ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरासमोर गेल्या दोन महिन्यांपासून गटारीचे पाणी, घाणीचे साम्राज्य, लाकडी व लोखंडी फर्निचरांचे अतिक्रमण यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. पादचारी मार्ग हरवले असून, मुख्य रस्ता गायब झाला आहे. चेंबर तुंबले असून, रस्त्याकरील ड्रेनेजचे पाणी वाहत आहे. अतिक्रमणामुळे या परिसरात एकेरी काहतूक होत आहे. मंदिरासमोरचे अतिक्रमण हटवून परिसर स्वच्छतेसाठी सिद्धेश्वर भक्तांनी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाला दोन दिवसांचा वेळ दिला आहे.
ग्रामदैवत सिद्धेश्वर दर्शनासाठी शहरातील आणि परगावचे हजारो भाविक रोज येत असतात. गड्डा यात्रेची तयारी सुरू झाली आहे. मंदिर परिसर भक्तांनी गजबजणार आहे. या पार्श्वभूमीवर लिंगायत समाजातील प्रमुख पदाधिकाऱयांकडून या गंभीर विषयांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. सिद्धेश्वर मंदिरात पायी चालत येणारे गावातील भक्त लक्ष्मीमंडई जवळील पूर्वेच्या गेटमधून ये-जा करू शकत नाहीत. लोखंडी सामान, बेकायदा उभारलेली खोकी आणि गेटसमोर थांबणाऱया मालवाहतूक वाहनांचा अडथळा होत आहे. पूर्वेकडील मंदिराचे प्रवेशद्वार तत्काळ मोकळे झाले पाहिजे, अशीही मागणी होत आहे. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पार्क चौकाकडे जाणारा तसेच लक्ष्मी मंडईमार्गे गावात जाणारा वाहतुकीचा हा एकमेव रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणांच्या किळख्यात आहे. होम मैदानाकडील मंदिरासमोरच्या रस्त्यावर गेले अनेक महिने ड्रेनेजचे पाणी रात्रंदिवस वाहत असून, दुर्गंधी पसरली आहे.
हे अतिक्रमण प्रशासनाला दिसत नसेल तर सिद्धेश्वर भक्तांना कायदा हातात घ्याका लागेल, असा इशाराही लिंगायत संघटनांनी दिला आहे. दोन दिवसांत मंदिरासमोरचा दक्षिणेकडचा रस्ता आणि पूर्केकडील प्रवेशद्वार अतिक्रमणमुक्त न झाल्यास गुरुवारपासून महापालिकेच्या प्रवेशद्वारात निद्रा आंदोलन करून प्रशासनाला बांगडय़ांचा आहेर देण्यात येईल, असाही इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.























































