विरोधी पक्षांची आज बैठक, प्रमुख पक्षांचे नेते राहणार उपस्थित

1048

कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. या परिस्थितीत सर्वांनी एकत्र येऊन कोरोना विरुद्धची लढाई लढण्यासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्षांची बैठक यूपीए आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलावली आहे. शुक्रवारी दुपारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह 15 प्रमुख पक्षांचे नेते सहभागी होणार असून देशातील जनतेचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.

कोरोनामुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच, बेरोजगार स्थलांतरित मजुरांचा प्रश्न गंभीर होताना दिसत आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 20 लाख कोटींच्या पॅकेजमधून शेतकरी, कष्टकरी वर्गाच्या हाताला फारसे काही लागेल असे दिसत नाही. या पार्श्वभूमीवर देश आणि राज्य पातळीवर निर्माण झालेल्या समस्यांतून एकत्रितपणे मार्ग काढण्याच्या दृष्टीने काय करता येईल या संदर्भात प्रामुख्याने चर्चा केली जाणार आहे. युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, ममता बॅनर्जी यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीला द्रमुकचे नेते स्टालिन, लोकशाही जनता दलाचे नेते शरद यादव, राष्ट्रवादी जनता दल नेते तेजस्वी यादव, झारखंडचे मुख्यमंत्री आणि झामुमोचे नेते हेमंत सोरेन आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

कामगार कायद्याबाबत चर्चा
केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे कामगार कपातीच्या धोका संभवत आहे. त्यातच भाजपशासित राज्यात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात सरकारने कामगार कायद्यात सुधारणा करण्याचा हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे कामगार कायदा आणि स्थलांतरित मजूर आणि फेरीवाल्यांच्या समस्या याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या नेत्यांना बरोबरच कामगार संघटनांचे नेतेही या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या