मंत्रालयातील लाच प्रकरणावरून विधान परिषदेत गदारोळ, चर्चेचा प्रस्ताव फेटाळल्याने विरोधकांचा सभात्याग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला लाच घेताना अटक झाल्याच्या प्रकरणावर बुधवारी विधान परिषदेत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी लावून धरली. मात्र सभापतींनी ती फेटाळून लावल्याने संतापलेल्या विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभात्याग केला.

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरंगे याला 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली होती. 13 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली होती. या लाचखोरी प्रकरणाचे पडसाद विधिमंडळात उमटत आहेत. या गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी नियम 289 अन्वये प्रस्ताव मांडला होता, मात्र सभापती राम शिंदे यांनी हा प्रस्ताव दालनातच फेटाळून लावला. या निर्णयावर शिवसेनेचे आमदार अ‍ॅड. अनिल परब यांनी हरकत घेतली. नियम 289 अन्वये प्रस्ताव स्वीकारायचा की नाही हा अधिकार तुमचा आहे, पण तो विषय 289 मध्ये कसा बसतो, हे सांगण्याची संधी आम्हाला मिळायला हवी. सरकारशी संबंधित भ्रष्टाचाराचा विषय असल्याने चर्चा टाळली जात आहे का? असा सवाल परब यांनी उपस्थित केला आणि सरकारला धारेवर धरले.

सभापती म्हणाले…

सभापती राम शिंदे यांनी विरोधकांचे म्हणणे फेटाळून लावत माझ्या दालनात निर्णय झालेला असल्याने सभागृहात त्यावर पुन्हा चर्चा करण्याची किंवा बोलण्याची परवानगी देता येणार नाही, असे सांगितले. तसेच ज्यांनी प्रस्ताव मांडला ते सदस्यही सभागृहात उपस्थित नाहीत. त्यामुळे चर्चा करता येणार नाही. सभापतींच्या या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करीत सभात्याग केला.