
अमेरिकेतील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी ‘Oracle’ ने हिंदुस्थानातून सुमारे १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात केल्याचे मानले जात आहे. तसेच, एका महिन्याच्या आतच कर्मचारी कपातीची आणखी एक फेरी होण्याची शक्यता आहे. जागतिक स्तरावर, कंपनीने आतापर्यंत सुमारे ३० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. हिंदुस्थानातून सुमारे १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली असून, येत्या एका महिन्याच्या आतच पुन्हा मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे.
कर्मचारी कपातीचा फटका बसलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश करूनही, Oracle चे हिंदुस्थानात सुमारे ३० हजार कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या एका ई-मेलमध्ये Oracle ने नमूद केले आहे की, कर्मचाऱ्यांना कंपनीतील काही संघटनात्मक बदलांविषयी माहिती देण्यात आली होती. “या बदलांमुळे, कामकाजात सुसूत्रता आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; आणि दुर्दैवाने, याचा परिणाम म्हणून तुम्ही सध्या भूषवत असलेले पद आता अनावश्यक ठरेल,” असे या ई-मेलमध्ये म्हटले आहे.
हिंदुस्थानात सेवेचे एक वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला कंपनीने १५ दिवसांचा पगार देण्याची तयारी दर्शवली आहे. याव्यतिरिक्त, कामावरून काढण्याच्या तारखेपर्यंतचा एक महिन्याचा थकीत पगार, रजेचे रोखीकरण, पात्रतेनुसार ग्रॅच्युइटी आणि एक महिन्याच्या नोटिस कालावधीचा पगारही दिला जाणार आहे. Oracle ने याशिवाय, अतिरिक्त लाभ म्हणून दोन महिन्यांचा पगारही देण्याची ऑफरही देऊ केली आहे.
Oracle चे माजी कर्मचारी मेरुगु श्रीधर यांनी सांगितले की, कंपनीने हिंदुस्थानात लागू केलेल्या १६ तासांच्या शिफ्टचा त्यांनी विरोध केला होता. याच कारणामुळे सप्टेंबर महिन्यात त्यांची कामावरून कपात करण्यात आली.





























































