
चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने जराही उसंत घेतलेली नाही. सततच्या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. पावसाचे पाणी साचल्याने काही मार्ग अद्यापही बंद आहेत. अशातच भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज जिल्हावाशियांसाठी धाकधूक वाढवणारा ठरला आहे. आज जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यावर होऊ नये याकरीता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा, विद्यालये, महाविद्यालये व खाजगी कोचिंग क्लासेस यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आव्हान जिल्हा प्रशासनाने केले आहे.