मुख्याधिकाऱ्यांकडून ऍक्शन; अतिक्रमणे हटविण्याचे आदेश

वाई शहरातील समस्यांबाबत मुख्याधिकारी संजीवनी दळवी व पोलीस निरीक्षक जितेंद्र शहा यांच्या उपस्थितीत नगरपालिकेत बैठक झाली. यामध्ये नागरिकांनी अतिक्रमण, पार्किंगसह विविध समस्यांना वाचा फोडली. बैठकीनंतर मुख्याधिकाऱयांनी तत्काळ ऍक्शन घेत शहरातील अतिक्रमणांची पाहणी करत मदिले. मुख्याधिकाऱयांच्या या रौद्र रूपामुळे व्यावसायिकांचे धाबे दणाणले.

या समस्यांचा आढावा घेण्यासाठी शहरातील नागरिकांची बैठक झाली. या बैठकीत नागरिकांनी पार्किंगसाठी पट्टे मारावेत, नो पार्किंग झोन करावे, हुतात्मा स्मारक चौक मोकळा ठेवावा, शहरातील बंद पडलेले सीसीटीव्ही सुरू करावेत, फुटपाथवर झालेले अतिक्रमण व दुकानांपुढील लोखंडी जाळ्या, जाहिरात बोर्ड काढून टाकावेत, भाजीविक्रेत्यांनी भाजी मंडईचा वापर करण्यासाठी प्रवृत्त करावे, अवजड वाहनांना सकाळी 10 ते 7 या कालावधीत दाणे बाजार येथे बंदी करावी, वाहतूक नियमनासाठी कार्यवाही करावी, अतिक्रमणांचा वेळोवेळी सर्व्हे करावा, शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवून त्याची कंट्रोल रुम तयार करावी, घंटागाडी वेळेत फिरवावी, मिरवणूकमार्गाची डागडुजी करावी, अशा समस्या मांडल्या. यावर मुख्याधिकारी दळवी व पोलीस निरीक्षक जितेंद्र शहा यांनी अधिकाऱयांना या समस्यांवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

जाळ्या व फलक हटवण्याची सूचना

बैठकीनंतर मुख्याधिकारी संजीवनी दळवी व पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी अधिकाऱयांसह शहरातून फेरफटका मारला. यावेळी व्यावसायिकांना जाळ्या व फलक हटवण्याची सूचना करण्यात आली. तसेच अतिक्रमणधारकांनाही ते हटवण्याचे आवाहन करण्यात आले. मुख्याधिकारी ऍक्शन मोडवर आल्याने व्यावसायिकांचे धाबे दणाणले. पुढीलवेळी अतिक्रमण ‘जैसे थे’ असल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला.