धाराशिव जिल्ह्यात आढळले 2 कोरोना पॉझिटीव्ह, एका रुग्णाचा खासगी वाहनाद्वारे 25 लोकांसोबत प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धाराशिव जिह्यात आज गुरुवारी दोन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 17 वर गेली आहे. यामधील 3 रुग्ण बरे होवून घरी गेलेले आहेत.

धाराशिव जिल्ह्यात आज उमरगा शहरात मुंबईहून आलेल्या एका तर कळंब तालुक्यातील शिराढोण येथील एका महिलेची कोरोना चाचणी पाझिटीव्ह आली आहे. उमरगा येथील महिला ही आपल्या दोन मुलासह चार दिवसापुर्वी उमरगा येथे खासगी वाहनाने आलेली आहे. तर कळंब तालुक्यातील शिराढोण येथील एका कापड व्यापाऱ्याच्या पत्नीस ताप तसेच श्वसनाचा त्रास होवू लागल्याने त्यांना लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांची चाचणी करण्यात आली असता त्या कोरोना पाझिटीव्ह आढळल्या आहेत.

उमरगा येथे कोरोना पाझिटीव्ह आढळून आलेली महिला ही 17 मे रोजी खासगी वाहनाने मुंबई येथून उमरगा शहरातील एसटी कॉलनी भागातील घरी राहण्यासाठी आली होती. 19 मे रोजी त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. आज हा स्वॅब पॉझिटीव्ह आल्याने त्यांच्यावर उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. ही महिला ज्या खासगी वाहनातून मुंबई येथून उमरगा येथे आली होती त्या वाहनातून अन्य 25 जणांनी प्रवास केलेला आहे. यामध्ये उमरगा शहरातील 20 व्यक्ती असून अन्य पाच व्यक्ती या ग्रामीण भागातील आहेत. प्रशासनाच्या वतीने या सर्वांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.